आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव नुकताच कोलकाता शहरात पार पडला. गव्हर्निंग काऊन्सिलने अद्याप तेराव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केलं नसलं तरीही स्पर्धेत सहभागी असलेल्या एका संघातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मार्चला आयपीएलला सुरुवात होण्याची शक्यता आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स वानखेडे मैदानावर आपला पहिला सामना खेळतील. मात्र त्याआधी गव्हर्निंग काऊन्सिल तेराव्या हंगामासाठीच्या सामन्यांमध्ये महत्वाचे बदल करण्याच्या तयारीत आहे. IANS वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

जाणून घ्या काय घडतंय पडद्यामागे??

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गव्हर्निंग काऊन्सिल तेराव्या हंगामाचं वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र आयपीएल सामन्यांचं प्रक्षेपण करणारी Star Sports शनिवार-रविवार दोन सामने खेळवण्याच्या बाजूने नाहीये. त्यातच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेली मालिका २९ मार्चला संपणार आहे. याचसोबत इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातला दुसरा कसोटी सामनाही ३१ मार्चला संपणार आहे. त्यामुळे नावाजलेल्या खेळाडूंना पहिल्या सामन्यापासून सहभागी करुन घेण्यासाठी गव्हर्निंग काऊन्सिल प्रयत्न करत असल्याचं कळतंय. काही संघमालकांनी परदेशी खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांमध्ये नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती.

दोन सामन्यांवर कात्री लागणार??

TRP चे आकडे बिघडत असल्यामुळे Star Sports वाहिनीने शनिवार आणि रविवारी दोन सामने खेळवण्याच्या कल्पनेला विरोध केला आहे. मात्र काही संघमालकांच्या मतानुसार आठवड्याच्या अखेरीस दोन सामने ठेवल्यास तरुण वर्ग मैदानात येईल. गेल्या हंगामात अनेक सामने मध्यरात्रीनंतर संपले होते, ज्यावर काही खेळाडूंनी नाराजीही व्यक्त केली होती. याच कारणामुळे गव्हर्निंग काऊन्सिल Double Header सामन्यांना कात्री लावण्याच्या विचारात आहे.

सामन्यांच्या वेळेतही बदल??

आयपीएलच्या साखळी फेरीतले सामने हे रात्री आठ वाजता सुरु होतात. मात्र स्पर्धेचं व्यस्त वेळापत्रक पाहता गेल्या हंगामापासून सामन्यांची वेळ संध्याकाळी सात वाजता करण्याची मागणी करण्यात आलेली होती. Star Sports वाहिनीनेही संध्याकाळी ७ किंवा साडेसात वाजता सामना सुरु करण्याच्या कल्पनेला होकार कळवला आहे. मात्र काही संघमालकांच्या मते सामन्याची वेळ बदलल्यास आठवड्यांच्या मधल्या दिवसांत मैदानात प्रेक्षकांची संख्या रोडावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात गव्हर्निंग काऊन्सिल या सर्व मुद्द्यांवर नेमका काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.