करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका आयपीएलच्या तेराव्या हंगामालाही बसला. पुढील सूचना मिळेपर्यंत बीसीसीआयने हा हंगाम स्थगित केला होता. मात्र यंदाची स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. यासाठी वर्षाअखेरीस या स्पर्धेचं आयोजन करण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे. स्पर्धेचं आयोजन भारतात करायचं की भारताबाहेर यावरुन गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा सुरु होती. श्रीलंका आणि UAE क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएलचा तेरावा हंगाम आपल्या देशात भरवण्याचा प्रस्ताव दिला होता. IANS वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआय अधिकाऱ्याने यंदाचा हंगाम भारताबाहेर आयोजित केला जाणार असल्याचं म्हटलंय.

“आम्ही जागांबद्दल अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही, पण यंदाचा हंगाम हा भारताबाहेर आयोजित केला जाईल असं चित्र दिसतंय. भारतामधली सध्याची परिस्थिती स्पर्धेचं आयोजन करावं अशी दिसत नाही. एक किंवा दोन मैदानांवर आठ संघ खेळणार, प्रत्येक खेळाडूची सुरक्षा, सरकारचे सर्व नियम पाळून आयोजन करणं सध्यातरी कठीण दिसतंय. सध्या UAE आणि श्रीलंका यांच्यात आयोजनाची शर्यत सुरु आहे. त्यामुळे फक्त साखळी सामने परदेशात भरवून मग परिस्थितीचा अंदाज घेऊन स्पर्धा भारतात हलवायची का??? याचसोबत प्रवास आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन याबद्दल लवकरच ठरवलं जाईल.” बीसीसीआय अधिकाऱ्याने IANS ला माहिती दिली.

ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात येणार आहे. मात्र करोनामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत नाहीयेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलचे संकेतही दिले आहेत. मात्र आयसीसीने अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही, ती घोषणा होईपर्यंत बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनाबद्दल ठोस निर्णय घेता येणार नाही. यासोबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आशिया चषकाचं आयोजन पुढे ढकलण्यासाठी तयार करण्याचं मोठं काम बीसीसीआय समोर असणार आहे. याआधीही २००९ आणि २०१४ साली आयपीएलचे सामने अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि UAE मध्ये भरवण्यात आले होते.