News Flash

IPL 2020 : विराटसेनेची मोहीम आजपासून

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा सनरायजर्स हैदराबादशी सामना

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा सनरायजर्स हैदराबादशी सामना

दुबई : इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये (आयपीएल) सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. भारताचा यशस्वी कर्णधार विराट कोहली अजून ‘आयपीएल’चे विजेतेपद पटकावू शकलेला नाही. यास्थितीत यंदाच्या १३व्या हंगामातील ‘आयपीएल’मध्ये विजेतेपद पटकावण्याचे लक्ष्य कोहलीसमोर आहे.

‘आयपीएल’मध्ये रोहित शर्मा, कोहली यांच्या फटकेबाजीवर क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष असते. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून शनिवारी सलामीच्या सामन्यात अपयशी ठरला होता. यास्थितीत कोहलीकडून फटकेबाजीचा आनंद लुटण्याची अपेक्षा क्रिकेटप्रेमींना आहे. उभय संघांची ताकद ही त्यांच्या भक्कम फलंदाजीमध्ये आहे. मात्र स्पर्धा जिंकण्यासाठी फक्त फलंदाजीच नाही तर सर्व आघाडय़ांवर खेळ सर्वोत्तम होणे आवश्यक आहे, याची कोहलीला जाणीव आहे. कोहलीला अद्याप महेंद्रसिंह धोनी आणि रोहित यांच्याप्रमाणे ‘आयपीएल’ विजेतेपदाचा आनंद लुटता आलेला नाही. कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला आतापर्यंत तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. यास्थितीत अंतिम लढतीपर्यंत कामगिरीत सातत्य टिकवण्याची गरज कोहलीच्या संघासमोर आहे. यंदाच्या संघात फलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचचा झालेला समावेश महत्त्वपूर्ण आहे. फिंच धडाकेबाज सुरुवात बेंगळूरुला करून देईल अशी अपेक्षा आहे. युवा सलामीवीर देवदत्त पडिकलकडूनही चांगली सुरुवात अपेक्षित आहे.

सनरायजर्स हैदराबादची भिस्त नेहमीप्रमाणे कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर आहे. वॉर्नरने तीन वेळा ‘आयपीएल’मध्ये ‘ऑरेंज कॅप’ (हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज) पुरस्कार पटकावला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादने २०१६मध्ये ‘आयपीएल’ जिंकली आहे. जॉनी बेअरस्टोसोबत वॉर्नर सलामीला येत असल्याने हैदराबादला चांगली सुरुवात अपेक्षित आहे. बेअरस्टो आणि वॉर्नर यांनी गेल्या हंगामात बेंगळूरुविरुद्धच केलेली १८५ धावांची सलामी (१६.२ षटकांत) ही ‘आयपीएल’च्या इतिहासात सर्वोत्तम ठरली होती.

गोलंदाजीमध्ये हैदराबादकडे भुवनेश्वर कुमार, रशीद खानसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. जोडीला फिरकीपटू मोहम्मद नाबी चांगल्याप्रकारे लयीत आहे. बेंगळूरुसाठी अखेरच्या षटकांतील गोलंदाजी ही नेहमीच भारी पडत असल्याचे दिसत आहे. मात्र फिरकीपटू यजुवेंद्र चहलकडून त्यांच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. बेंगळूरुची गोलंदाजी ही फिरकी गोलंदाजीवर अधिक अवलंबून आहे. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसला नुकतेच बेंगळूरुने करारबद्ध केले आहे.

७-६ बेंगळूरु आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत १४ सामने झाले आहेत. त्यात बेंगळूरुने सात आणि हैदराबादने ६ सामन्यांत विजय मिळवला आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७:३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, हिंदी १ (दोन्ही एचडी वाहिन्यांवर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 12:59 am

Web Title: ipl 2020 royal challengers bangalore face sunrisers hyderabad zws 70
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : ‘आयपीएल’मधील चार संघांना मुंबईच्या मार्गदर्शकांचे बळ!
2 IPL इतिहासातील १० व्या सुपरओव्हरमध्ये दिल्लीची बाजी, जाणून घ्या आधीच्या ९ सामन्यांचा निकाल
3 IPL2020: “मयंकला सुपर ओव्हरमध्ये का नाही पाठवलं?”; नेटिझन्सचा संताप
Just Now!
X