14 August 2020

News Flash

आयपीएलची परदेशवारी यंदा जवळपास निश्चित !

BCCI च्या वरिष्ठ कार्यकारणी सभेत एकमत

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन यंदा दुबईत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारकडून अधिकृत परवानगी आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने अधिकृत भूमिका जाहीर केल्यानंतर बीसीसीआय आयपीएलबद्दल आपली घोषणा करणार असल्याचं कळतंय. शुक्रवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ कार्यकारणीची बैठक झाली, त्यात या निर्णयावर एकमत झाल्याचं कळतंय. आयसीसीने टी-२० विश्वचषक रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर, बीसीसीआय भारत सरकारकडे आयपीएल भारतात आयोजन करण्याबाबत परवानगी मागेल. पण देशातली परिस्थिती तोपर्यंत सुधारलेली नसेल तर यंदाची स्पर्धा ही युएईमध्ये हलवली जाईल. जाणून घेऊयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले.

डिसेंबरपर्यंत स्थानिक क्रिकेट नाही –

डिसेंबर महिन्यापर्यंत कोणत्याही पद्धतीच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. स्थानिक स्पर्धांमध्ये ३८ संघ सहभागी होतात. सध्याच्या परिस्थितीत खेळाडूंसाठी सराव आणि प्रवास या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे बीसीसीआय खेळाडूंचं आरोग्य धोक्यात घालण्याच्या तयारीत नाही. स्थानिक क्रिकेटसोबतच भारतात यंदा कोणत्याही प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवलं जाणार नाही. दुलिप, देवधर आणि इतर चॅलेंजर स्पर्धा यंदाच्या वर्षी रद्द करण्यात येणार आहेत.

अहमदाबादमध्ये भारतीय खेळाडूंसाठी कँप –

जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान अशी ओळख मिळवलेल्या मोटेरा स्टेडीयमवर यंदा करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एकही सामना भरवता आला नाही. पण वर्षाअखेरीस भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी मोटेरा मैदानावर भारतीय खेळाडूंसाठी कँपचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे. मोटेरा मैदानात खेळाडूंना राहण्याची व्यवस्था आहे. सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या या मैदानात गरज पडल्यास खेळाडूंना क्वारंटाइन करण्याची सुविधाही आहे.

याव्यतिरीक्त राहुल जोहरी यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने सीईओ पदासाठी जाहीरात देण्याचं ठरवलं आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय गेल्या काही महिन्यांपासून तयारी करत होती. त्यामुळे आयसीसी आता टी-२० विश्वचषकाबद्दल अधिकृत निर्णय कधी घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 10:22 am

Web Title: ipl 2020 to be held in uae conditions apply psd 91
Next Stories
1 ‘बीसीसीआय’ला ४८०० कोटींचा दंड!
2 जैव-सुरक्षिततेच्या नियमांवर मायकल होल्डिंग यांची टीका
3 २०२१ टोक्यो ऑलिम्पिकचे वेळापत्रक या वर्षीसारखेच
Just Now!
X