स्मिथ, मॅक्सवेल, फिंच, पॅटिन्सन यांची हकालपट्टी; सॅमसनकडे राजस्थानचे कर्णधारपद
नवी दिल्ली : भारताविरुद्ध कसोटी मालिकेत पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंची इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामाच्या बाजारातही घसरण झाली आहे. स्टीव्ह स्मिथ, आरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल या ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंची त्यांच्या संघांनी हकालपट्टी के ली आहे. याशिवाय लसिथ मलिंगा, हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंनासुद्धा अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने वगळले आहे.
एप्रिल महिन्यात ‘आयपीएल’चा १४वा हंगाम भारतात होण्याची शक्यता असून फेब्रुवारीमध्ये याकरिता खेळाडूंची लिलावप्रक्रिया होणार आहे. या लिलावप्रक्रियेपूर्वी बुधवापर्यंत आठही संघांनी कायम राखण्यात आलेले तसेच वगळण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी, असे आदेश ‘आयपीएल’च्या प्रशासकीय समितीकडून देण्यात आले होते. स्मिथच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन राजस्थानचे नेतृत्व करणार आहे. ‘‘गेल्या आठ वर्षांत सॅमसन राजस्थानचा महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून उदयास आला असून एका भारतीय खेळाडूने संघाचे कर्णधारपद सांभाळावे, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे २०२१च्या हंगामासाठी सॅमसनकडे संघाचे नेतृत्व सोपवताना आम्हाला आनंद होत आहे,’’ असे राजस्थानचे मालक मनोज बदाले म्हणाले.
३१ वर्षीय स्मिथ ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात पूर्णत: अपयशी ठरला. त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थानला बाद फेरीही गाठता आली नाही. याशिवाय नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत स्मिथच्या खिलाडूवृत्तीसंबंधी अनेक चर्चा रंगल्याचा परिणाम यावर झाल्याचे समजते.
दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबने ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉट्रेल यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मॅक्सवेलला गेल्या हंगामात एकही षटकार लगावता आला नाही. मुंबईच्या चार विजेतेपदांत मोलाची भूमिका बजावणाऱ्या मलिंगाने दुखापतीमुळे संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या हंगामातून माघार घेतली होती. परंतु आता मुंबईने त्याला संघात स्थान दिलेले नाही. मलिंगाव्यतिरिक्त जेम्स पॅटिन्सन, नॅथन कोल्टर-नाइल या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनासुद्धा मुंबईने वगळले आहे.
तीन वेळच्या विजेत्या चेन्नईने अपेक्षेप्रमाणे केदार जाधव, पीयूष चावला, मुरली विजय यांना नारळ दिला असला तरी गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या सुरेश रैनाला संघात कायम राखले आहे.
बेंगळूरुने फिंचव्यतिरिक्त ख्रिस मॉरिस, डेल स्टेन या परदेशी खेळाडूंसह शिवम दुबे, उमेश यादव, पवन नेगी या भारतीय खेळाडूंनाही संघातून काढले आहे.
संघातून वगळलेले नामांकित खेळाडू
* मुंबई इंडियन्स : लसिथ मलिंगा, नॅथल कोल्टर नाइल, जेम्स पॅटिन्सन, शर्फेन रुदरफोर्ड, मिचेल मॅक्लेनेघन, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय.
* चेन्नई सुपर किंग्ज : शेन वॉटसन (निवृत्त), मुरली विजय, केदार जाधव, पीयूष चावला, हरभजन सिंग, मोनू सिंग.
* रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : आरोन फिंच, डेल स्टेन, ख्रिस मॉरिस, मोईन अली, पार्थिव पटेल (निवृत्त), शिवम दुबे, उमेश यादव, इसुरू उडाना, पवन नेगी, गुरुकीरात सिंग मान.
* दिल्ली कॅपिटल्स : अॅलेक्स कॅरी, जेसन रॉय, संदीप लामिच्छाने, तुषार देशपांडे.
* सनरायजर्स हैदराबाद : बिली स्टॅनलेक, फॅबियन अॅलन, संजय यादव, बी. संदीप, यारा पृथ्वीराज.
* राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ, टॉम करन, ओशेन थॉमस, अंकित राजपूत, वरुण आरोन, आकाश सिंग, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंग.
* किंग्ज इलेव्हन पंजाब : ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉट्रेल, जिमी निशाम, मुजीब उर रहमान, हार्डस विल्जोएन, कृष्णप्पा गौतम, करुण नायर, जगदीश सुचित, तेजिंदर सिंग.
* कोलकाता नाइट रायडर्स : निखिल नाईक, सिद्धेश लाड, एम सिद्धार्थ, टॉम बॅन्टन, ख्रिस ग्रीन, हॅरी गर्नी.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 3:20 am