आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी चेन्नईमध्ये पार पडला. यंदाच्या लिलावात दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख रुपये मोजले. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलवरही मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या बंगळुरुने त्याला 14.25 कोटींची बोली लावून खरेदी केलं. याशिवाय यंदाच्या लिलावात सर्वांचं लक्ष होतं ते म्हणजे माजी महान खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला कोण खरेदी करणार याकडे.

लिलावाच्या पहिल्या फेरीत अर्जुन तेंडुलकरवर एकाही संघाने बोली लावली नाही. पण, लिलावाच्या अखेरच्या फेरीत मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच 20 लाख रुपयांना खरेदी केलं. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संधी मिळाल्याने आणि मुंबईसारख्या तगड्या संघाने खरेदी केल्यानंतर अर्जुन तेंडुलकरही चांगलाच आनंदात आहे. लिलावानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. “मी लहानपणापासून मुंबई इंडियन्सचा खूप मोठा चाहता राहिलोय….माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघ मालकांचे आभार मानतो. मुंबई पलटनमध्ये सहभागी होण्यास मी खूपच उत्सुक आहे आणि ब्लू गोल्ड जर्सी घालण्याची आतुरतेने वाट बघतोय”, अशी प्रतिक्रिया अर्जुनने दिली आहे.

अर्जुन तेंडुलकर वेगवान गोलंदाज आहे. तसेच, वेळप्रसंगी तो विस्फोटक फलंदाजीही करु शकतो. अर्जुन तेंडूलकर तळाला संघासाठी मोठे फटके मारु शकतो. अर्जुनने नुकत्याच झालेल्या पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. अर्जुनने एकाच षटकात ५ षटकार लगावत ३१ चेंडूत ७७ केल्या. तसेच तीन महत्वाचे बळीही मिळवले.


अर्जुनने लिलावाच्या एक दिवसआधी इन्स्टाग्राम स्टोरीवर मुंबई इंडियन्सच्या जर्सीतील एक फोटो शेअर केला होता. लिलाव सुरू होण्याआधीपासूनच ट्विटरवर अर्जुन ट्रेंड होत होता.