News Flash

IPL २०२१ : ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात राहतील किंवा…

सरकारच्या निकषात कोणतीही सूट मिळणार नसल्याचे बोर्डाचे मत

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पुढे ढकलण्यात आली असून त्यामध्ये खेळणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू एकतर भारतातच राहतील किंवा तिसर्‍या देशात जातील. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (एसीए) मंगळवारी आपल्या राष्ट्रीय सरकारच्या धोरणात सूट मिळवणार नसल्याचे स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियन सरकारने भारताकडून येणारी १५ मेपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. आयपीएलमध्ये खेळाणारे क्रिकेटपटू आणि माजी क्रिकेटपटूंसह सुमारे ९००० ऑस्ट्रेलियन लोक भारतात अडकले आहेत. भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून दररोज सुमारे ३ लाख प्रकरणे नोंदवली जात आहेत.

सीए आणि एसीएने मंगळवारी जाहीर केलेल्या आपल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे, की ऑस्ट्रेलियन सरकारने किमान १५ मेपर्यंत भारताची उड्डाणे रद्द केली आहेत आणि या निर्णयाचा आम्ही आदर करतो. या प्रकरणात आम्ही कोणतीही सूट मागणार नाही. आयपीएलमध्ये खेळणारे तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू अ‍ॅडम झम्पा, केन रिचर्डसन (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) आणि अँड्र्यू टाय (राजस्थान रॉयल्स) हे सरकारने विमानबंदी लागू करण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले पण, उर्वरित क्रिकेटपटू भारतातच राहिले आहेत. पंच पॉल रीफेल यांनीही परत जाण्याचा निर्णय घेतला, पण कतारमार्गे त्यांची उड्डाणेही रद्द करण्यात आली. समालोचक मायकेल स्लेटर यांनाही मालदीवला जावे लागले. त्यांनी तेथे पोहोचल्यावर सरकारवर तोंडसुख घेतले.

आयपीएलने ट्विट करत निवेदन प्रसिद्द केले असून आयपीएल स्थगित करण्याचे कारण सांगितले आहे. “आयपीएल आणि बीसीसीआयने तातडीने बैठक घेत आयपीएलचा सध्याचा हंगाम तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसंच इतरांच्या सुरक्षेशी बीसीसीआय तडजोड करू इच्छित नाही. भागधारकांची सुरक्षा, आरोग्य लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला,” असे आयपीएलकडून सांगण्यात आले आहे.

आयपीएलच्या १४व्या सत्रात आतापर्यंत फक्त २९ सामने खेळले गेले होते. मंगळवारी अरुण जेटली स्टेडियमवर मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार होता. मात्र, हैदराबादचा खेळाडू वृद्धिमान साहाला करोनाची लागण झाली. ९ एप्रिलपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत एकूण ६० सामने खेळले जाणार होते. या लीगचा अंतिम सामना आयपीएल ३० मे रोजी अहमदाबादमध्ये होणार होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 9:32 pm

Web Title: ipl 2021 australian players can stay in india or go to third country adn 96
Next Stories
1 भारताच्या मदतीसाठी अजून एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची करोना लढ्यात उडी
2 ‘‘बाबा, तुमची आठवण येतेय’’, वॉर्नरच्या मुलींचे ‘ते’ चित्र व्हायरल
3 IPL पुढं ढकललं..आता टी-२० वर्ल्डकपचं काय?
Just Now!
X