इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मंगळवारी होणाऱ्या लढतीत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुपुढे नव्या दमाच्या दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे या लढतीत सरशी साधून पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी बेंगळूरुचा संघ उत्सुक आहे, तर दिल्ली मात्र विजयी घोडदौड राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

बेंगळूरुने सलग चार सामने जिंकून हंगामाला धडाक्यात प्रारंभ केला. परंतु चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा विजयरथ रोखला. दिल्लीने मात्र गेल्या तीन लढतींमध्ये अनुक्रमे पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांना धूळ चारल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु

सलामीवीरांकडून अपेक्षा

कोहली (१५१ धावा) आणि देवदत्त पडिक्कल (१७१ धावा) या सलामी जोडीवर बेंगळूरुची फलंदाजी टिकून आहे. हे दोघे स्वस्तात माघारी परतल्यावर मधल्या फळीत एबी डीव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर अतिरिक्त दडपण आल्याचे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दिसून आले. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या हर्षल पटेलसह (१५ बळी) अन्य गोलंदाजांना अधिक टिचून मारा करण्याची कला अवगत करावी लागेल.

दिल्ली कॅपिटल्स

मधल्या फळीत सुधारणेची गरज

पृथ्वी शॉ (१६६ धावा) आणि ऑरेंज कॅप परिधान करणारा शिखर धवन (२५९ धावा) यांची सलामी जोडी दिल्लीला उत्तम सुरुवात करून देत आहे. मात्र ‘पॉवरप्ले’नंतरच्या षटकांत धावांची गती राखण्याबरोबरच मोठे फटके खेळण्यात कर्णधार ऋषभ पंत, मार्कस स्टोइनिस, शिम्रान हेटमायर हे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरत आहेत. रविचंद्रन अश्विनने स्पर्धेतून माघार घेतली असली तरी अमित मिश्रा आणि अक्षर पटेल लयीत असल्यामुळे दिल्लीला चिंता करण्याचे कारण नाही.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोटर््स २, स्टार स्पोटर््स १ हिंदी