यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट हंगामात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा विजयरथ रोखणे शुक्रवारी पंजाब किंग्जला जड जाईल.

‘आयपीएल’ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेंगळूरुने सहा सामन्यांपैकी पाच विजयांसह १० गुण मिळवले आहेत, तर पंजाब दोन विजय आणि चार पराभवांमुळे सहाव्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाइट रायडर्सकडून पाच गडी राखून पराभूत झालेल्या पंजाबसाठी बेंगळूरुसारख्या आव्हानात्मक संघाशी सामना करणे सोपे नसेल. बेंगळूरुने मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर एक धावेने निसटता विजय मिळवला होता. बेंगळूरुने आतापर्यंतच्या प्रवासात फक्त चेन्नई सुपर किंग्जकडून हार पत्करली आहे.

आतापर्यंतच्या सहा सामन्यांत पंजाबच्या फलंदाजातील सातत्याचा अभाव प्रकर्षाने समोर आला आहे. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या खात्यावर प्रथम फलंदाजी करताना १०६, १२० आणि १२३ अशा यंदाच्या हंगामातील नीचांकी धावसंख्यांची नोंद झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु

चौकडीवर भिस्त

दिल्लीला नमवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या बेंगळूरुच्या यशात एबी डीव्हिलियर्सचे महत्त्वाचे योगदान आहे. बेंगळूरुच्या फलंदाजीची भिस्त विराट कोहली (एकूण १६३ धावा), देवदत्त पडिक्कल (एकूण १८८ धावा), डीव्हिलियर्स (एकूण २०४ धावा) आणि ग्लेन मॅक्सवेल (एकूण २२३ धावा) या चौकडीवर आहे. मागील सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रजत पाटीदारने उत्तम कामगिरी बजावली. बेंगळूरुच्या वेगवान माऱ्याची धुरा हर्षल पटेल (६ सामन्यांत १७ बळी), मोहम्मद सिराज (६ सामन्यांत १७ बळी) यांच्यावर आहे.

पंजाब किंग्ज

पूरनऐवजी मलान?

राहुल यंदाच्या हंगामात पंजाबचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरत आहे. त्याने ९१, ५, ६१, ४, नाबाद ६० आणि १९ धावा केल्या आहेत. परंतु मयांक अगरवालकडून त्याला तोलामोलाची साथ मिळत नाही. ख्रिस गेलने दोन सामने वगळता बाकीच्या सामन्यांत घोर निराशा केली. निकोलस पूरनसुद्धा धावांसाठी झगडत आहे. त्याने पाच डावांत फक्त २८ धावा केल्या असून, यापैकी तीनदा त्याला भोपळासुद्धा ओलांडता आला नव्हता. ट्वेन्टी-२० प्रकारातील इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज डेव्हिड मलानचा पूरनऐवजी समावेश करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोटर््स २, स्टार स्पोटर््स १ हिंदी