गेल्या सलग पाच हंगामांत बाद फेरी गाठणारा सनरायजर्स हैदराबादचा संघ अद्यापही यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. बुधवारी दुपारी होणाऱ्या लढतीत हैदराबादचा पंजाब किंग्जशी सामना होणार असून अनुभवी फलंदाज केन विल्यम्सन या लढतीसाठी उपलब्ध आहे.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादला तिन्ही लढतींमध्ये धावांचा पाठलाग करताना पराभवाला सामोरे जावे लागल्याने तूर्तास ते गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहेत. तर राजस्थान रॉयल्सविरुद्ध निसटता विजय मिळवल्यानंतर पंजाबला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सकडून दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघ या लढतीत विजय प्राप्त करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.

सनरायजर्स हैदराबाद

वॉर्नरवर अतिरिक्त भार

मधल्या फळीतील सर्व फलंदाज खेळपट्टीवर तळ ठोकून फटकेबाजी करण्यात अपयशी ठरत असल्याने सलामीवीर वॉर्नरवर अतिरिक्त भार येत आहे. गेल्या सामन्यात वॉर्नरच्या साथीने सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टोने दमदार फलंदाजी केली. परंतु त्यानंतर मनीष पांडे, विजय शंकर, विराट सिंग, अभिषेक शर्मा यांनी सपशेल निराशा केल्यामुळे हैदराबादच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. रशीद खान आणि मुजीब उर रहमान या अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंवर हैदराबादच्या गोलंदाजीची भिस्त आहे. मात्र पूर्णपणे तंदुरुस्त असलेल्या विल्यम्सनला खेळवण्यासाठी वॉर्नर बेअरस्टो, रशीद आणि मुजीब यांपैकी कोणाला संघाबाहेरचा रस्ता दाखवणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

पंजाब किंग्ज

गोलंदाजीत सुधारणा आवश्यक

दिल्लीविरुद्ध १९५ धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरल्यामुळे पंजाब किंग्जच्या गोलंदाजांवर टीका होत आहे. त्यातच पंजाब पहिल्यांदाच चेन्नईत खेळणार असल्याने फिरकीला पोषक खेळपट्टीवर ते रवी बिश्नोई आणि मुरुगन अश्विन यांना संधी देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सलामीवीर मयांक अगरवाल आणि कर्णधार के. एल. राहुल उत्तम कामगिरी करत आहेत. मात्र ख्रिस गेलकडून धडाकेबाज खेळी पाहण्यासाठी पंजाबचे चाहते आतुर आहेत.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोटर््स १ हिंदी