इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सलामीच्या अपयशातून सावरत बलाढ्य पंजाब किंग्जशी तोलामोलाची लढत देण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जला कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या प्रेरणादायी खेळाची आणि गोलंदाजीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

चेन्नईने पहिल्याच लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून सात गडी राखून पराभव पत्करला, तर पंजाबने रोमहर्षक लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध चार धावांनी निसटता विजय मिळवला.

चेन्नई सुपर किंग्ज

सलामीवीरांकडून अपेक्षा

ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिस ही सलामीची जोडी अपयशी ठरली. याचप्रमाणे आवेश खानने भरवशाच्या धोनीचा शून्यावर त्रिफळा उडवला. पण तरीही चेन्नईने दिल्लीविरुद्ध ७ बाद १८८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात सुरेश रैना (५४), मोईन अली (३६), सॅम करन (३४), रवींद्र जडेजा (२६) आणि अंबाटी रायुडू (२३) यांचे महत्त्वाचे योगदान होते. परंतु फलंदाजांनी कमावले ते गोलंदाजांनी गमावले. दिल्लीच्या शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या सलामीवीरांनी १३८ धावांची सलामी नोंदवत चेन्नईच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. दीपक चहर (४-०-३६-०), करन (२-०-२४-०), शार्दूल ठाकूर (३.४-०-५३-२), जडेजा (२-०-१६-०) आणि मोईन (३-०-३३-०) हे गोलंदाज अत्यंत महागडे ठरले.

पंजाब किंग्ज

राहुलवर मदार

पंजाबने ६ बाद २२१ असा धावसंख्येचा डोंगर उभारूनही अखेरच्या चेंडूपर्यंत राजस्थानने त्यांना झुंजवले. सलामीवीर के. एल. राहुलने कर्णधाराची खेळी साकारताना ५० चेंडूंत ९१ धावा केल्या. ख्रिस गेल (२८ चेंडूंत ४० धावा) आणि दीपक हुडा (२८ चेंडूंत ६४ धावा) यांनीही दिमाखदार फटकेबाजी केली. त्यामुळे पंजाबला फलंदाजीपेक्षाही चेन्नईप्रमाणेच गोलंदाजीची चिंता आहे. राजस्थानच्या संजू सॅमसनने ६३ चेंडूंत ११९ धावांची खेळी साकारत पंजाबशी एकाकी झुंज दिली. पण युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने (३/३५) पंजाबला तारले. अखेरच्या षटकात राजस्थानला १३ धावा हव्या असताना अर्शदीपने फक्त ८ धावा देत संघाला जिंकून दिले. अनुभवी मोहम्मद शमीनेही (२/३३) टिच्चून गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज झाये रिचर्ड्सन (१/५५) आणि रिले मेरेडिथ (१/४९) यांनी मात्र बऱ्याच धावा दिल्या.

१४-९  चेन्नई आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत २३ सामने झाले असून, यापैकी चेन्नईने १४ आणि पंजाबने ९ सामने जिंकले आहेत.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स फस्र्ट, स्टार स्पोटर््स १ हिंदी.