रोहित शर्माची आणि सूर्यकुमार यादवची आक्रमकता हे मुंबई इंडियन्सचे सामर्थ्य  , तर फॅफ ड्यू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडची फटकेबाजी हे चेन्नई सुपर किंग्जचे वैशिष्ट्य. मुंबई आणि चेन्नई यांच्यात शनिवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील लढतीत हीच सर्वोत्तमतेसाठी झुंज चाहत्यांना अनुभवता येईल.

याआधी सामन्यांचा वेध घेतल्यास मुंबईने राजस्थान रॉयल्सला तर चेन्नईने सनरायजर्स हैदराबादला सात गडी राखून नमवले आहे. त्यामुळे विजयी सातत्य कामय ठेवण्यास दोन्ही संघ उत्सुक आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईने सहा सामन्यांपैकी पाच विजय मिळवले आहेत. याचप्रमाणे मुंबईने सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर तीन सामने गमावले आहेत.

मुंबई इंडियन्स

हार्दिककडून अपेक्षा

क्विंटन डी कॉकला (एकूण ११७ धावा) सूर गवसल्याने मुंबईची ताकद वधारली आहे. राजस्थानविरुद्ध त्याने नाबाद ७० धावांची खेळी साकारली होती. या सामन्यात मुंबईच्या मधल्या फळीतील कृणाल पंड्या आणि किरॉन पोलार्ड यांनी दर्जाला साजेशी कामगिरी बजावली. अष्टपैलू हार्दिक पंड्याला (एकूण ३६ धावा) अपेक्षेनुसार कामगिरी दाखवता आलेली नाही. सूर्यकुमारने (एकूण १७० धावा) चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतरण करण्याची आवश्यकता आहे. वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा आणि ट्रेंट बोल्ट हाणामारीच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी करीत आहेत. लेग-स्पिनर राहुल चहरवर (एकूण ११ बळी) फिरकीची प्रमुख मदार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज

ड्यू प्लेसिस-ऋतुराजवर भिस्त

‘आयपीएल’ गुणतालिकेतील आघाडीच्या स्पर्धेत अग्रेसर असलेल्या चेन्नईचे सलामीवीर ड्यू प्लेसिस (एकूण २७० धावा) आणि ऋतुराज (एकूण १९२ धावा) धावा करून लक्षवेधी सलामी भागीदाऱ्या करीत आहेत. मधल्या फळीचे फलंदाज चोख कामगिरी बजावत आहेत. मोईन अली (एकूण १४८ धावा) फटकेबाजी करीत संघाला साह्य करीत आहे, तर सुरेश रैना (एकूण १२१ धावा) जबाबदारीनुसार खेळत आहे. याशिवाय अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (एकूण १०९ धावा) आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यापर्यंत चेन्नईची फलंदाजीची फळी सखोल आहे. दीपक चहर (एकूण ८ बळी), सॅम करन (एकूण ६ बळी) आणि शार्दूल ठाकूरवर चेन्नईच्या गोलंदाजीची मदार आहे.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोटर््स २, स्टार स्पोटर््स १ हिंदी