मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जवर 6 गडी राखून सहज विजय मिळवला. या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  पहिल्या सत्रात पंजाबच्या फलंदाजांनी पूर्ण निराशा केली. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची भेदक गोलंदाजी आणि इतर खेळाडूंनी केलेल्या दमदार क्षेत्ररक्षणामुळे पंजाबला 20 षटकात 8 बाद 106 धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तरात चेन्नईने हे आव्हान 15.4 षटकांतच गाठले आणि यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. महेंद्रसिंह धोनीचा हा चेन्नईसाठी 200वा सामना होता, त्यामुळे हा विजय त्याच्यासाठी अजूनच खास ठरला. सामन्यात 4 षटकात 4 बळी घेणाऱ्या दीपक चहरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

चेन्नईचा डाव

पंजाबच्या छोटेखानी आव्हानाचा पाठवाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ऋतुराज गाकवाडला (5) बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि मोईन अली यांनी 6 षटकात चेन्नईच्या 1 बाद 32 धावा फलकावर लावल्या. मोईन अलीने संयमी खेळ करत डु प्लेसिसला उत्तम साथ दिली. या दोघांनी 37 चेंडूत आपली अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. फिरकीपटू मुरुगन अश्विनने अलीला बाद करत अर्धशतकापासून वंचित ठेवले. अलीने 7 चौकार आणि एका षटकारासह 46 धावा केल्या. विजयासाठी 8 धावा असताना मोहम्मद शमीने सुरेश रैना आणि अंबाती रायुडूला बाद करत चेन्नईला लागोपाठ दोन धक्के दिले. त्यानंतर सॅम करन आणि डुप्लेसिसने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. डु प्लेसिस 36 धावांवर नाबाद राहिला.

पंजाबचा डाव

मंयक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांनी पंजाबच्या डावाची सुरुवात केली. मात्र, दीपक चहरने टाकलेल्या पहिल्याच षटकात मयंकची दांडी गुल झाली. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर तिसऱ्या षटकात गेलसोबत चोरटी धाव घेताना रवींद्र जडेजाने राहुलला धावबाद केले. त्यानंतर दीपकने पुन्हा गोलंदाजीला येत ख्रिस गेल (10) आणि निकोलस पूरनला (0) माघारी धाडले. या षटकात त्याने एकच धाव दिली. त्यानंतर वैयक्तिक चौथ्या षटकात दीपक हुडाला 10 धावांवर बाद करत दीपक चहरने आपला चौथा बळी घेतला. हे षटक त्याने निर्धाव टाकले आणि आपल्या 4 षटकात केवळ 13 धावा देत 4 बळी टिपले.

यानंतर झाय रिचर्ड्सन आणि शाहरुख खान यांनी 31 धावांची भागीदारी रचली. चेन्नईचा फिरकीपटू मोईन अलीने रिचर्ड्सनला (15) बोल्ड करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर एका बाजूने शाहरुख खानने आपली आक्रमक फटकेबाजी सुरूच ठेवली.  मात्र, दुसऱ्या बाजुने त्याला एकाही फलंदाजाची साथ मिळाली नाही. डावाच्या 17व्या षटकात पंजाबने मुरुगन अश्विनच्या रुपात आपला सातवा गडी गमावला. ब्राव्होने त्याला बाद केले.  20व्या षटकात सॅम करनने शाहरुख खानलाही गमावले. त्याने 4 चौकार आणि 2 षटकारांसह  47 धावांची खेळी केली. चेन्नईकडून चहरव्यतिरिक्त सॅम करन, ब्राव्हो आणि मोईन अली यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.