इंग्लंड महिला संघाची स्टार खेळाडू केट क्रॉस हिला आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जकडून (सीएसके) उत्कृष्ट भेट मिळाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज हा केट क्रॉसचा आवडता आयपीएल संघ आहे. तिला फ्रेंचायझीकडून नवीन जर्सी देण्यात आली आहे.

करोना विषाणूमुळे आयपीएलच्या स्थगितीवर केट क्रॉस निराश झाली होती. पण चेन्नईची जर्सी मिळाल्यानंतर ती आनंदी आहे. तिने ट्विटरवर या जर्सीसोबत दोन फोटो शेअर केले. या जर्सीवर केट क्रॉसचे नाव छापलेले आहे. “चेन्नई सुपर किंग्जचे आभार. त्यांनी मला माझी पहिली सीएसकेची जर्सी पाठवली. जेव्हा पुन्हा एकदा सुरक्षित वातावरणात स्पर्धा सुरू होईल तेव्हा मी घरातून समर्थन करीन”, असे केटने आपल्या ट्विटमघध्ये म्हटले.

 

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणाऱ्या सामन्यात केट ही जर्सी घालून संघाला प्रोत्साहन देणार होती, पण आयपीएलच्या स्थगितीमुळे तिची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

केट क्रॉस आयपीएलची चाहती

 

केट क्रॉस ही इंग्लंडची वेगवान गोलंदाज आहे. आपल्या संघासाठी तिन्ही स्वरूपात ती खेळली आहे. क्रॉस ही आयपीएलची मोठी चाहती आहे. चेन्नई सुपर किंग्ज हा तिचा लीगमधील आवडता संघ आहे. ”हा अगदी योग्य निर्णय आहे, कारण क्रिकेटआधी आरोग्य येते. भारतात जे या विषाणूमुळे त्रासले आहेत, त्यांच्या मी सोबत आहे”, असे केटने आयपीएल २०२१च्या स्थगितीनंतर सांगितले.