स्थगितीनंतर पुन्हा सुरु झालेल्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. ऋतुराज गायकवाडने ५८ चेंडूंमध्ये ८८ धावा करत चेन्नईचा डावा सावरला आणि मुंबईसमोर विजयासाठी मोठी धावसंख्या उभारली. सामना सुरु झाल्यानंतर चेन्नईने एकामागोमाग विकेट्स गमावल्याने सात धावांवर तीन गडी बाद अशी स्थिती झाली होती. मात्र ऋतुराज गायकवाडमुळे ही धावसंख्या सहा गडी बाद १५६ वर पोहोचली होती.

या सामन्यात चेन्नईने मुंबईचा २० धावांनी पराभव करत गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं आहे. चेन्नईच्या विजयाचा पाया रचणाऱ्या ऋतुराज गायकवाडने ही आपली आतापर्यंतची सर्वोत्त्म खेळी असल्याचं म्हटलं आहे.

“नक्कीच ही माझी आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. सुरुवातीच्या विकेट्स गेल्याने आणि ड्रेसिग रुममध्ये सर्व वरिष्ठ खेळाडू असल्याने मला चांगली खेळी करत संघाला १३०, १४० पर्यंत न्यायचं होतं. पण नंतर १५० नंतर नेऊ शकलो,” असं ऋतुराज गायकवाडने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.

“जेव्हा धोनी तुमच्या आजुबाजूला असतो आणि मॅनेजमेंट पाठिंबा देतं तेव्हा तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही,” असंही यावेळी त्याने म्हटलं. २४ वर्षीय ऋतुराजने श्रीलंकेविरोधातील मालिकेत संघात पदार्पण केलं होतं. याचा आपल्याला आयपीएलसाठी फायदा झाल्याचं ऋतुराज सांगतो.

ऋतुराजने ८८ धावा करताना चार चौकार आणि तीन षटकार लगावले. मात्र त्याने त्या पिचवर फलंदाजी करणं अवघड होतं हेदेखील मान्य केलं. १९ धावांवर असताना विकेटकिपर क्विंटनने ऋतुराजला जीवनदान दिलं होतं.