आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अनेक रंगतदार सामने पाहायला मिळाल आहेत. आज मुंबईच्या वानखेडेवर दोन ‘किंग्ज’ संघ एकमेकांसमोर येणार आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज हे संघ आज आयपीएल 2021चा आठवा सामना खेळणार आहेत. मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर चेन्नईला आज पंजाबला हरवून स्पर्धेत आत्मविश्वास कमावण्याची संधी असेल.

चेन्नई संघाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खूप चुका केल्या. त्यांनी सोपे झेलही सोडले होते आणि गोलंदाजांनीही निराशाजनक कामगिरी नोंदवली होती. त्यामुळे अंतिम अकरा संघ निवडताना धोनीसमोर मोठा प्रश्न असणार आहे. चेन्नईची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याच्या संघात अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांनी मागील काही काळापासून जास्त क्रिकेट खेळलेले नाही.

आयपीएलमध्ये चेन्नई आणि पंजाब या दोन्ही संघांमध्ये अनेक रोमांचक सामने झाले आहेत. मात्र, जेव्हा हे संघ मैदानात असतात तेव्हा चेन्नईचे पारडे अधिक जड असल्याचे समोर आले आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब संघ यांच्यात 23 सामने झाले आहेत. त्यापैकी सीएसकेने 14, तर पंजाबने 9 सामन्यांत विजय मिळविला आहे. पंजाबविरुद्धच्या शेवटच्या 5 पैकी 4 सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे.

दुसरीकडे पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात निसटता विजय मिळवला. पंजाबने राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु संजू सॅमसनच्या शतकी खेळीमुळे राजस्थानला पंजाबच्या आव्हानाच्या जवळ जाता आले. या सामन्यात पंजाबची गोलंदाजी अपेक्षेनुसार चांगली झाली नाही. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात मेळ साधणे राहुलला अपेक्षित आहे.

संभाव्य प्लेईंग XI

चेन्नई सुपर किेंग्ज

ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सॅम करन, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर.

पंजाब किंग्ज

केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, झाय रिचर्ड्सन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.