तीन वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा आज सोमवारी सामना राजस्थान रॉयल्सशी मुंबईत होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना गमावल्यानंतर दोन्ही संघांनी आपापल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) पंजाब किंग्ज विरूद्ध सहज विजय नोंदविला, तर राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध दोन गुण मिळवले. हीच विजयी लय कायम राखण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.

दुसऱ्या सामन्यात दीपक चहरच्या कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्जने विजयी पुनरागमन केले. चहरने पंजाबविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करताना चार गडी बाद केले. त्यामुळे संघाने सहा गडी राखून विजय मिळविला. चहरने आपला हाच फॉर्म कायम राखावा, अशी संघाची इच्छा आहे आणि त्याचबरोबर सॅम करन, शार्दुल ठाकूर आणि इतरांनीही महत्त्वपूर्ण योगदान द्यावे अशी अपेक्षा आहे.

एनगिडी आणि उथप्पाला स्थान?

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला असून त्याला आज प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाऊ शकते. तर, ऋतुराजच्या बदली रॉबिन उथप्पाला संघात जागा मिळू शकते.

दरम्यान, राजस्थान रॉयल्ससाठी कर्णधार संजू सॅमसनचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्याखेरीज जोस बटलर आणि डेव्हिड मिलरही संघासाठी चांगले योगदान देऊ शकतात. अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने दिल्लीविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. युवा गोलंदाज चेतन साकारियाही अनुभवी मॉरिस आणि मुस्तफिजुर रहमानसोबत चांगली गोलंदाजी करू शकतो.

आकडेवारी

आयपीएमध्ये या दोन्ही संघांदरम्यान 23 सामने झाले असून त्यामध्ये चेन्नईने 14 आणि राजस्थानने 9 सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामात यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये राजस्थानने सीएसकेला दोन्ही सामन्यात पराभूत केले होते.

संभाव्य प्लेईंग XI

चेन्नई – ऋतुराज गायकवाड / रॉबिन उथप्पा, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, सॅम करन, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर.

राजस्थान – मनन वोहरा / यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन साकारिया, मुस्तफिजुर रहमान