चेन्नईनं हैदराबादवर विजय मिळवत आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. आयपीएलमध्ये पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईचा हा सलग पाचवा विजय आहे. तर हैदराबादचा या स्पर्धेतील पाचवा पराभव आहे. हैदराबादनं चेन्नईसमोर विजयासाठी १७२ धावांचं लक्ष्य ठेवलं होत. हे लक्ष्य चेन्नईच्या फलंदाजांनी सहज गाठलं. आघाडीला आलेल्या ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस जोडीनं चांगली सुरुवात केली त्यामुळे हा विजय सोपा झाला. ऋतुराज आणि फाफ या दोघांनी अर्धशतकं झळकावली. फाफनं ३८ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. तर ऋतुराजनं ४४ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. यात १२ चौकारांचा समावेश आहे.

चेन्नईच्या गोलंदाजांना हैदराबादचे ३ गडी बाद करण्यात यश आलं. मात्र गोलंदाजांनी धावसंख्या रोखण्यात मोलाचं योगदान दिलं. डेविड वॉर्नर आणि मनिष पांडे मोठे फटके मारण्यासाठी झगडत राहिले. त्यामुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डेविड वॉर्नरनं ५५ चेंडूत ५७ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. तर मनिष पांडेनं ४६ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. यात ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागिदारी केली. मात्र धावसंख्या धीम्या गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे १७१ या धावसंख्येवरच मजल मारता आली.

डेविड वॉर्नर १० हजार धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये

हैदराबादकडून राशीद खाननं चांगली गोलंदाजी केली. त्याने तीन गडी बाद केले. ४ षटकात ३६ धावा देत ३ गडी बाद केले. मात्र दुसरा एकही गोलंदाज चेन्नईचा गडी बाद करु शकला नाही.

IPL 2021: ‘या’ तीन खेळाडूंनी कमी वयात केल्या हजार धावा पूर्ण

हैदराबादचा या आयपीएलमधील हा पाचवा पराभव आहे. या पराभवासह हैदराबाद आठव्या स्थानावरच आहे. या पराभवासह हैदराबादचं पुढचा प्रवास कठीण होत चालला आहे. अंतिम चार संघात स्थान मिळवण्यासाठी हैदराबादला अजून मेहनत घेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.