वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने आज लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात शुक्रवार ते सोमवारपर्यंत कडक लॉकडाउन व अन्य दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आगामी आयपीएलच्या हंगामावर कोणते पडसाद उमटणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, बीसीआयच्या अधिकाऱ्याने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

 

आठवड्याच्या शेवटी कडक निर्बंध लावल्यामुळे आयपीएलमधील मुंबईतील संघ हॉटेल ते वानखेडे स्टेडियमपर्यंत कसे प्रवास करणार यासंबंधी शंका निर्माण झाली होती. मात्र, या सामन्यांच्या आयोजनात कोणताही अडथळा येणार नसल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

एएनआयशी दिलेल्या या प्रतिक्रियेत अधिकाऱ्याने सांगितले की, संघ जैव सुरक्षित वातावरणात आहेत. ते बसने प्रवास करणार आहेत, हा एक बायो बबलचाच भाग आहे. त्यामुळे कोणतेही संकट येणार नाही.

आयपीएलचा चौदावा हंगाम 9 एप्रिल ते 30 मे अशा कालावधीत रंगणार आहे. लीगचा उद्धाटनाचा पहिला सामना 9 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये चेन्नईत रंगणार आहे. तर, 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स मुंबईच्या वानखेडेवर आमने सामने असतील.

आयपीएल 2021 आणि करोना

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर देवदत्त पडिक्कल करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे.  देवदत्तपूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल करोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. यंदाच्या आयपीएलमध्ये करोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा आणि देवदत्त तिसरा खेळाडू आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला करोनाने ग्रासले होते. मात्र, त्यानंतर तो निगेटिव्ह आढळला. चेन्नई सुपर किंग्जच्या कंटेट टीमच्या सदस्यालाही करोनाची लागण झाली आहे.