माले (मालदीव) : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि समालोचक मायकेल स्लेटर यांनी मद्यधुंद अवस्थेत मालदीवमध्ये आपापसात झालेल्या हाणामारीच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

‘आयपीएल’ स्थगित केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आणि स्लेटर सध्या मालदीव येथे वास्तव्यास असून लवकरच ते विशेष विमानाद्वारे मायदेशी परतणार आहेत. शुक्रवारी रात्री माले येथील ताज कोरल रिसॉर्टमधील बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत असताना वॉर्नर-स्लेटर यांच्यात हाणामारी झाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले, परंतु वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिलेल्या स्पष्टीकरणात असे काहीही झाले नसल्याचे स्पष्ट केले.

‘‘प्रसारमाध्यमांना अशा प्रकारचे वृत्त कुठून मिळते, हे मला खरंच कळत नाही. आमच्यात हाणामारीसारखे काही घडल्याचा तुमच्याकडे पुरावा असल्यास माझ्यासमोर तो सादर करावा, कारण माझ्या माहितीप्रमाणे आमच्यात असे काहीही घडलेले नाही,’’ असे वॉर्नर म्हणाला.

स्लेटर यांनीदेखील वॉर्नरच्या मताला दुजोरा देताना बारमध्ये असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले. ‘‘वॉर्नर आणि मी खूप चांगले मित्र असून आमच्यात भांडण अथवा हाणामारी होण्याची शक्यताच नाही,’’ असे स्लेटर म्हणाले.