News Flash

DC vs PBKS : ‘गब्बर’च्या गर्जनेमुळे पंजाब किंग्ज गारद!

दिल्ली कॅपिटल्सचा पंजाबवर 6 गडी राखून विजय

दिल्ली कॅपिटल्स

मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या आयपीएलच्या 11व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जच्या 196 धावसंख्येच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या 92 धावांच्या शानदार खेळीमुळे दिल्लीने पंजाबवर 6 गडी राखून हा विजय मिळवला. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या होत्या. पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतके रचत संघासाठी बहुमुल्य योगदान दिले. मात्र, पंजाबचे गोलंदाज दिल्लीच्या फलंदाजांवर लगाम घालू शकले नाहीत. धवनला सामनावीर पुरस्कार मिळाला.

दिल्लीचा डाव

पंजाबच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या दिल्लीच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या 5 षटकात दिल्लीने अर्धशतकी पल्ला गाठला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात अर्शदीपने पृथ्वीला बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वीने 17 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये दिल्लीने 1 बाद 62 धावा केल्या. यानंतर शिखर धवनने स्टीव्ह स्मिथला सोबत घेत दिल्लीला शतकाजवळ नेले. दरम्यान धवनने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 11व्या षटकात दिल्लीने शंभरी गाठली, मात्र, शेवटच्या चेंडूवर मेरेडिथने स्मिथला तंबूचा रस्ता दाखवला. स्मिथला केवळ 9 धावा करता आल्या. त्यानंतर  शतकाकडे कूच करणाऱ्या धवनची रिचर्ड्सनने दांडी गुल केली. धवनने 49 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 92 धावा केल्या. 15 षटकात दिल्लीने 3 बाद 152 धावा अशी मजल मारली. धवन बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि मार्कस स्टॉइनिस यांनी छोटेखानी भागीदारी रचली. शेवटची 3 षटके बाकी असताना रिचर्ड्सनने पंतला बाद केले. त्यानंतर ललित यादव आणि स्टॉइनिस यांनी 18.4 षटकातच संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्टॉइनिसने 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. पंजाबकडून झाय रिचर्ड्सनला सर्वाधिक 2 बळी मिळाले.

पंजाबचा डाव

बर्थडे बॉय केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पंजाबच्या डावाची दमदार सुरुवात केली. 2 षटकात या दोघांनी पंजाबसाठी 25 धावा केल्या. दिल्लीसाठी पदार्पण केलेला वेगवान गोलंदाज लुकमान मेरीवालाच्या पहिल्या षटकात या दोघांनी 20 धावा ठोकल्या. मागील काही सामन्यात फ्लॉप ठरलेल्या मयंकनेही सुंदर फटके खेळत संघाची धावसंख्या वाढवली. पॉवरप्लेच्या 6 षटकात या दोघांनी 59 धावा उभारल्या. त्यानंतर मयंकने अर्धशतक साकारले. 10 षटकात पंजाबने बिनबाद 94 धावा उभारल्या. 13व्या षटकात दिल्लीला पहिले यश मिळाले.  मेरीवालाने स्थिरावलेल्या मयंकला बाद केले. मयंकने 36 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 69 धावांची खेळी केली. मयंक-राहुलने पंजाबसाठी 122 धावांची भागीदारी उभारली.

मयंक बाद झाल्यानंतर राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. 16व्या षटकात राहुल रबाडाच्या गोलंदाजीवर झेलहाद झाला. राहुलने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 61 धावांची खेळी केली. राहुलनंतर गेलही लवकर तंबूत परतला. वोक्सने त्याला बाद केले. गेल परतल्यानंतर दिल्लीने पंजाबला जास्त धावा काढू दिल्या नाहीत. पूरनही 19व्या षटकात स्वस्तात माघारी परतला. आवेश खानने त्याला बाद केले. शाहरुख खानने 20व्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबला दोनशे धावांच्या जवळ जाता आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 11:24 pm

Web Title: ipl 2021 dc beat pbks by six wickets in mumbai adn 96
टॅग : IPL 2021
Next Stories
1 IPL 2021 : …अन् काही तासांतच गब्बरने हिसकावली ऑरेंज कॅप!
2 IPL 2021: ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाकडे?
3 IPL 2021: विराटसेनेची विजयी हॅट्ट्रिक; कोलकात्याला ३८ धावांनी पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थानी
Just Now!
X