सलामीवीर मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सवर ७ गडी राखून विजय नोंदवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. शुबमन गिलची चांगली सलामी आणि डावाच्या उत्तरार्धात स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने केलेल्या वादळी खेळीमुळे कोलकाताला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. प्रत्युत्तरात दिल्लीने १६.३ षटकातच विजय साकारला. दिल्लीकडून पृथ्वीने ४१ चेंडूत तब्बल ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी करत संघाचा विजय सोपा केला. त्याने डावाच्या पहिल्याच षटकात कोलकाताचा वेगवान गोलंदाज शिवम मावीला ६ चौकार ठोकले. पृथ्वीव्यतिरिक्त सलामीवीर शिखर धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची खेळी केली.

दिल्लीचा डाव

दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने शिवम मावीच्या पहिल्याच षटकाच ६ चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. पहिल्या षटकात दिल्लीने २५ धावा वसूल केल्या. या पराक्रमानंतर पृथ्वीने आपली आक्रमक फलंदाजी सूरू ठेवत संघाला चौथ्या षटकाच्या आधीच अर्धशतकी पल्ला गाठून दिला. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दिल्लीने बिनबाद ६७ धावा फलकावर लावल्या. यंदाच्या हंगामातील या पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावा ठरल्या. ८व्या षटकात पृथ्वीने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या हंगामातील हे वेगवान अर्धशतक ठरले. दुसऱ्या बाजुला असलेल्या शिखर धवनने संयमी तर पृथ्वीने आक्रमक फलंदाजी करत कोलकाताला नामोहरम केले. शॉने धवनसह १०व्या षटकात दिल्लीचे शतक फलकावर लावले. १३ षटकात या दोघांनी १२३ धावांची भागीदारी केली.

१३२ धावांची भागीदारी उभारल्यानंतर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने १४व्या षटकात शिखर धवनला पायचित पकडले. धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची खेळी केली. विजयासाठी ९ धावांची आवश्यकता असताना कमिन्सने पृथ्वीला बाद केले. पृथ्वीने ४१ चेंडूत तब्बल ११ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ८२ धावांची दमदार खेळी केली. पृथ्वीनंतर कमिन्सने ऋषभ पंतलाही (१६) बाद करत दिल्लीचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्कस स्टॉइनिसने १७व्या षटकात प्रसिध कृष्णाला चौकार मारत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

कोलकाताचा डाव

नितीश राणा आणि शुबमन गिल यांनी कोलकाताच्या डावाची सुरुवात केली. २५ धावांची  भागीदारी केल्यानंतर दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेलने कोलकाताला पहिला दणका दिला. अक्षरच्या गोलंदाजीवर नितीश राणा वैयक्तिक १५ धावांवर यष्टिचित झाला.  त्यानंतर शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी पहिल्या पॉवरप्लेपर्यंत ४५ धावा केल्या. अर्धशतकी भागीदारीकडे कूच करत असताना मार्कस स्टॉइनिसने १०व्या षटकात राहुल त्रिपाठीला (१९) माघारी धाडले. राहुलनंतर आलेल्या कर्णधार ईऑन मॉर्गनला ललित यादवने भोपळाही फोडू दिला नाही. स्टीव्ह स्मिथने मॉर्गनचा झेल टिपला. याच षटकात ललितने सुनील नरिनचाही शून्यावर काटा काढला. अवघ्या १० धावांत कोलकाताने ३ गडी गमावले. मागील काही सामन्यात अपयशी ठरलेला शुबमन गिल या सामन्यात चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, १३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. आवेश खानने त्याला वैयक्तिक ४३ धावांवर स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. शुबमनने आपल्या खेळीत ३ चौकार आणि एक षटकार लगावला.  शुबमनचा झेल हा स्मिथचा ५०वा आयपीएल झेल ठरला.

आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांनी कोलकाताला शंभरी गाठून दिली. १७व्या षटकात कार्तिक (१४) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यानंतर रसेलने शेवटच्या षटकात केलेल्या हाणामारीमुळे कोलकाताला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. त्याने २७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४५ धावांची खेळी केली. २० षटकात कोलकाताने ६ गडी गमावत १५४ धावा फलकावर लावल्या.

हेड-टू-हेड आकडेवारी

आकडेवारीनुसार, आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध कोलकाताचा रेकॉर्ड चांगला आहे. दोन्ही संघ आतापर्यंत २७ वेळा भिडले आहेत, त्यापैकी १४ सामने कोलकाताने, तर दिल्लीने १२ सामने जिंकले आहेत. मागील हंगामात दोन्ही संघ बरोबरीत होते. दोन्ही संघ आयपीएल २०२०मध्ये दोनदा आमनेसामने आले. यात त्यांनी प्रत्येकी एकदा विजय नोंदवला आहे.

प्लेईंग XI

दिल्ली – ऋषभ पंत (कर्णधार-यष्टीरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉइनिस, अक्षर पटेल, ललित यादव, इशांत शर्मा, आवेश खान आणि कगिसो रबाडा.

कोलकाता – ईऑन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नरिन, पॅट कमिन्स, शिवम मावी, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.