सलामीवीर फलंदाज शिखर धवनने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला ७ गड्यांनी मात दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या ऋषभ पंतने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार मयंक अग्रवालने केलेल्या ९९ धावांच्या नाबाद खेळीमुळे पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सला १६७ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दिल्लीने ३ गडी गमावत १७.४ षटकातच हे लक्ष्य गाठले.

दिल्लीचा डाव

पंजाबच्या १६७ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी उभारली. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सामनावीराचा मान पटकावलेला फिरकीपटू हरप्रीत ब्रार पुन्हा एकदा पंजाबसाठी धावून आला. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात पृथ्वीची दांडी गुल केली. पृथ्वीने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ३९ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथला साथीला घेत शिखर धवनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांनी संघाचे शतक फलकावर लावले. रिले मेरिडिथने स्मिथला (२४) बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. विजयाच्या जवळ पोहोचतान ऋषभ पंतने मोठा फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावली. पंतनंतर आलेल्या शिमरोन हेटमायरने ४ चेंडूत १६ धावा कुटत विजयावर शिक्कामोर्तब केले. धवनने ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६९ धावांची खेळी केली.

पंजाबचा डाव

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६६ धावा केल्या. केएल राहुलच्या अनुपस्थितीत प्रभासिमरन सिंगसह कर्णधार मयंक अग्रवालने सलामी दिली. मात्र, दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने प्रभासिमरनला वैयक्तिक १२ धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. पॉवरप्लेमध्ये पंजाबने ख्रिस गेललाही गमावले. रबाडाने त्याचा त्रिफळा उडवला. आज पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या डेव्हिड मलानने अग्रवालसोबत भागीदारी रचली. या दोघांनी पंजाबसाठी अर्धशतकी भागीदारी उभारली. दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेलने मलानची दांडी गुल करत पंजाबला तिसरा धक्का दिला. मलान बाद झाल्यानंतर मयंकला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही, त्याने एका बाजुने संघाला सावरले. वेगवान गोलंदाज आवेश खानने टाकलेल्या २०व्या षटकात पंजाबने २३ धावा वसूल केल्या. या धावांमुळे पंजाबला दीडशेपार जाता आले. मयंकने ५८ चेंडूत ८ चौकार आणि ४ चौकारांसह ९९ धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ४ षटकात ३६ धावा देत सर्वाधिक ३ बळी टिपले. आवेश खान आणि अक्षरला प्रत्येकी एक बळी घेता आला.

कोण आत कोण बाहेर?

राहुलच्या अनुपस्थितीमुळे पंजाबच्या संघात जगातील अव्वल क्रमांकाचा टी-२० फलंदाज डेव्हिड मलानने आज आयपीएल पदार्पणाचा सामना खेळला. लीगमध्ये अपयशी ठरलेल्या निकोलस पूरनला आज विश्रांती देण्यात आली. दिल्लीने मागील सामन्यातील संघ कायम राखला होता.

 

प्लेईंग XI

पंजाब – मयंक अग्रवाल (कर्णधार), प्रभासिमरन सिंग (यष्टीरक्षक), ख्रिस गेल, डेव्हिड मलान, दीपक हुडा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ख्रिस जॉर्डन, रिले मेरिडिथ, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी.

दिल्ली – ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, ललिच यादव, कगिसो रबाडा, इशांत शर्मा, आवेश खान.