फिरकीपटू अमित मिश्राने केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचे स्टार फलंदाज मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. फिरकीला मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकात 9 बाद 137 धावा उभारल्या. रोहितव्यतिरिक्त (44) मुंबईच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. आज दिल्ली संघात संधी मिळालेल्या अनुभवी अमित मिश्राने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने केवळ 4 गडी गमावले. मिश्राला सामनावीर पुरस्कार मिळाला. तब्बल 10 वर्षानंतर दिल्लीने या मैदानावर विजय साकारला आहे. याआधी 2010मध्ये त्यावेळच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने चेन्नई सुपर किंग्जला चेन्नईत 6 गड्यांनीच मात दिली होती.

 

दिल्लीचा डाव

मुंबईच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. फिरकीपटू जयंत यादवने दिल्लीचा मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉला दुसऱ्याच षटकात माघारी पाठवले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि शिखर धवन संघासाठी उभे राहिले. पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने 1 बाद 39 धावा केल्या. 9व्या षटकात स्मिथ आणि धवनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर कायरन पोलार्डने मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. त्याने स्टीव्ह स्मिथला वैयक्तिक 33 धावांवर पायचित पकडले. सुसाट फॉर्मात असलेला धवन संघाला विजय मिळवून देईल असे वाटत होते, पण 15व्या षटकात दिल्लीने धवनला गमावले. मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने त्याला कृणालकरवी झेलबाद केले. धवनने 5 चौकार आणि एका षटकारासह 45 धावांची खेळी केली. धवननंतर पंतही स्वस्तात माघारी परतला, पण शिमरोन हेटमायर आणि ललित यादव यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीने 19.1 षटकात 4 गडी गमावत हे आव्हान गाठले.

मुंबईचा डाव

रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या षटकात दिल्लीचा गोलंदाज मार्कस स्टॉइनिसने क्विंटन डि कॉकला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. डि कॉकने 2 धावा केल्या. त्यानंतर रोहितने सूर्यकुमारला हाताशी घेत पहिल्या पॉवरप्लेमध्ये मुंबईसाठी 1 बाद 55 धावा केल्या. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर आवेश खानने दिल्लीला यश मिळवून दिले. चांगल्या फॉर्मात खेळणाऱ्या सूर्यकुमारला मुंबईने 7व्या षटकात गमावले. सूर्यकुमारने 24 धावा केल्या. त्यानंतर अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या रोहितला अमित मिश्राने आपल्या जाळ्यात अडकवले. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित स्मिथकडे झेल देऊन बसला. त्याने 3 षटकार आणि 3 चौकारांसह 44 धावा केल्या.

रोहित बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. मिश्राने हार्दिक पंड्याला शून्यावर बाद केले. हार्दिकनंतर कृणाल पंड्याही स्वस्तात बाद झाला. त्याला ललित यादवने बाद केले. त्यानंतर आलेल्या कायरन पोलार्डला मिश्राने आपल्या गुगलीत अडकवले. या पडझडीनंतर ईशान किशन आणि जयंत यादवने छोटेखानी भागीदारी उभारली. किशनने 26 तर यादवने 23 धावा केल्या. मिश्राव्यतिरिक्त आवेश खानने 15 धावा देत 2 बळी टिपले.