News Flash

SRH vs DC : सुपर संडेला सुपर ओव्हरचा थरार!

केन विल्यमसनची झुंजार खेळी व्यर्थ

delhi capitals
दिल्ली कॅपिटल्स

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आज यंदाच्या आयपीएल पर्वाची पहिली सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादवर मात दिली. या सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादसमोर २० षटकात ४ बाद १५९ धावा केल्या. पृथ्वी शॉ आणि शिखन धवन यांनी दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. शॉच्या अर्धशतकामुळे दिल्लीला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. प्रत्युत्तरात केन विल्यमसनच्या नाबाद ६६ धावांच्या खेळीमुळे हैदराबादने २० षटकात ७ बाद १५९ धावा फलकावर लावल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना  हैदराबादने दिल्लीसमोर ८ धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य गाठताना दिल्लीची दमछाक झाली, पण शेवटच्या चेंडूवर त्यांनी विजय मिळवला. दिल्लीच्या पृथ्वी शॉला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

सुपर ओव्हरचा थरार

सुपर ओव्हरमध्ये हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन हे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. तर अक्षर पटेलने दिल्लीसाठी षटक टाकले. तिसऱ्या चेंडूवर विल्यमसनने चौकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर विल्यमसनने दोन धावा घेतल्या, पण यातील एक धाव अपूर्ण होती. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये दिल्लीला ८ धावांचे लक्ष्य मिळाले.

दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंत आणि शिखर धवन हे फलंदाज हैदराबादच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले. तर, हैदराबादकडून राशिद खानने षटक टाकले. पहिल्या चेंडूवर पंतने एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर धवनने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर पंतने राशिदला चौकार खेचला. चौथ्या चेंडू निर्धाव गेला. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर एक धाव घेत दिल्लीने विजयावर शिक्कामोर्तब केले.

हैदराबादचा डाव

दिल्लीच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी चौथ्याच षटकात कर्णधार डेव्हिड वॉर्नरला गमावले. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनच्या षटकात धाव घेताना वॉर्नर धावबाद झाला. त्याने केवळ ६ धावा केल्या. हैदराबादचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर आवेश खानने आक्रमक खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टोने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ३८ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये हैदराबादने २ बाद ५६ धावा केल्या. १२व्या षटकात आवेशने हैदराबादला अजून एक धक्का दिला. त्याने विराट सिंहला बाद केले. दुसऱ्या बाजुला असलेला केन विल्यमसनने हैदराबादचा धावफलक हलता ठेवला.

विराट सिंहनंतर केदार जाधव मैदानात आला. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. अमित मिश्राच्या गोलंदाजीवर पंतने त्याला यष्टिचीत केले. केदारला ९ धावाच करता आल्या. त्यानंतर केन विल्यमसनने १६व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अक्षर पटेलने एकाच षटकात आभिषेक शर्मा आणि राशिद खानला बाद करत हैदराबादला संकटात टाकले. १९व्या षटकात विजय शंकर माघारी परतला, आवेश खानचा तो तिसरा बळी ठरला. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. या षटकात विल्यमसन आणि सुचितने फटकेबाजी करत १५ धावा केल्या आणि सामना सुपरओव्हरपर्यंत नेला. विल्यमसनने ८ चौकारांसह नाबाद ६६ धावांची खेळी केली. दिल्लीकडून आवेश खानने ३ तर अक्षर पटलने २ बळी घेतले.

दिल्लीचा डाव

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. ६ षटकात या दोघांनी ५१ धावा फलकावर लावल्या. पृथ्वीने हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत १०व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.  पुढच्याच षटकात दिल्लीने शिखर धवनला गमावले. राशिद खानने त्याला बाद केले. धवनने २८ धावांचे योगदान दिले. धवन-शॉने पहिल्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी रचली. धवननंतर पृथ्वीही धावबाद झाला. त्याने ७ चौकार आणि एका षटकारासह ५३ धावा केल्या. त्यानंतर ऋषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दिल्लीचे शतक फलकावर लावले. १६ षटकात या दोघांनी दिल्लीला १२७ धावांपर्यंत पोहोचले. १९व्या षटकात सिद्धार्थ कौलने पंतला बाद करत ही भागीदारी तोडली. पंतने ४ चौकार आणि एका षटकारासह ३७ धावांचे योगदान दिले. पंतनंतर आलेला शिमरोन हेटमायरही कौलच्याच षटकात झेलबाद झाला. शेवटच्या षटकात दिल्लीने १४ धावा वसूल केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 12:02 am

Web Title: ipl 2021 delhi capitals beat sunrisers hyderabad in super over thriller adn 96
Next Stories
1 राजस्थान रॉयल्सला आणखी एक धक्का; चौथ्या परदेशी खेळाडूनं सोडली साथ
2 “देवाला कळलं, की रजनीकांत म्हातारा झालाय म्हणून त्यानं…”, धोनीचं जुनं ट्विट चर्चेत
3 IPL 2020: जडेजाच्या वादळापुढे बंगळुरु बेचिराख; चेन्नई गुणतालिकेत अव्वल
Just Now!
X