रोमहर्षक पहिल्या लढतीमधील निसटता पराभव आणि अष्टपैलू बेन स्टोक्सने दुखापतीमुळे माघार घेतल्याने राजस्थान रॉयल्सचा संघ हादरला आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बुधवारी राजस्थान आणि बलाढ्य दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लढत म्हणजेच दोन नव्या दमाच्या कर्णधारांची कसोटी ठरणार आहे.

कर्णधार संजू सॅमसन पुन्हा आपल्या धडाकेबाज खेळीनिशी संघाला विजय मिळवून देईल, अशी राजस्थानला आशा आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने यंदाच्या हंगामाला स्वप्नवत प्रारंभ करताना सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला नमवण्याची किमया साधली. त्यामुळे राजस्थानपेक्षा दिल्लीचे पारडे जड मानले जात आहे.

सोमवारी राजस्थानला पंजाब किंग्जविरुद्धच्या रंगतदार सामन्यात चार धावांनी पराभव पत्करावा लागला होता. २२२ धावांचे लक्ष्य पेलताना कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात सॅमसनने ६३ चेंडूंत ११९ धावांची झुंजार खेळी साकारली. परंतु अखेरचा चेंडू सीमापार धाडून संघाला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात सॅमसन झेलबाद झाला. त्याने १२ चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी केली. स्टोक्सने हाताला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतली असल्याने राजस्थनच्या चिंतेत भर पडली आहे.

दिल्ली कॅपिटल्स

धवन-पृथ्वीवर भिस्त

गतवर्षीच्या उपविजेत्या दिल्लीविरुद्ध चेन्नईने ७ बाद १८८ धावा उभारल्या होत्या. परंतु हे आव्हान पेलताना शिखर धवन (५४ चेंडूंत ८५ धावा) आणि पृथ्वी शॉ (३८ चेंडूंत ७२ धावा) यांनी १३८ धावांनी सलामी नोंदवत पायाभरणी केली. मग पंत (१५*) मार्कस स्टॉइनिस (१४) यांनी विजयी सोपस्कार करीत आठ चेंडू राखून संघाला जिंकवले. दिल्लीकडून ख्रिस वोक्स (२/१८) आणि आवेश खान (२/२३) यांनी टिच्चून गोलंदाजी केली. रविचंद्रन अश्विन, टॉम करन, अमित मिश्रा आणि स्टॉइनिस यांना दर्जाला साजेशी गोलंदाजी करता आली नव्हती. कॅगिसो रबाडाच्या करोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्यामुळे तो खेळू शकणार आहे. पण आनरिख नॉर्किएचा अहवाल अद्याप आलेला नाही.

राजस्थान रॉयल्स

गोलंदाजीची चिंता

फलंदाजीपेक्षा गोलंदाजी ही राजस्थानची प्रमुख चिंता आहे. चेतन सकारियाने (३/३१) लक्षवेधी पदार्पण केले. परंतु बाकीचे गोलंदाज मात्र महागडे ठरले. त्यामुळेच प्रतिस्पध्र्यांना मोठी धावसंख्या उभारता आली. मुस्ताफिझूर रेहमान, ख्रिस मॉरिस, स्टोक्स, श्रेयस गोपाळ आणि राहुल तेवतिया यांच्या गोलंदाजीवर पंजाबच्या फलंदाजांनी तुफानी आक्रमण केले. स्टोक्सच्या अनुपस्थितीत जोस बटलर, शिवम दुबे आणि रयान पराग यांच्यावर खेळ उंचावून सॅमसनला साथ देण्याची जबाबदारी असेल. पहिल्या सामन्यात बटलर (२५), दुबे (२३), पराग (२५) आणि मनन व्होरा (१२) यांनी डावाला चांगली सुरुवात केली. परंतु मोठी खेळी उभारत सॅमसनला अपेक्षित साथ देण्यात अपयशी ठरले.११-११  राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत २१ सामने झाले असून, दोन्ही संघांनी प्रत्येकी ११ सामने जिंकले आहेत.९

११-११  राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत २१ सामने झाले असून, दोन्ही संघांनी प्रत्येकी ११ सामने जिंकले आहेत.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स फस्र्ट, स्टार स्पोटर््स १ हिंदी.