इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाला करोनाचा संसर्ग झाला आहे. नॉर्किया आता आयपीएलचा 14वा हंगाम खेळण्यासाठी भारतात आला होता. बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार, तो क्वारंटाइन कालावधीत होता.

 

मागील मोसमात नॉर्कियाचे जबरदस्त प्रदर्शन

दक्षिण आफ्रिकेहून भारतात आल्यानंतर त्याला वेगळे ठेवण्यात आले होते. त्याच्या काही करोना चाचण्यांचे निकाल निगेटिव्ह आले. मात्र, दुर्दैवाने त्याची एक चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नॉर्किया हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा आघाडीचा गोलंदाज आहे. गेल्या हंगामात त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 156.2 किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. 2012 ते 2020 या आयपीएल हंगामातील हा सर्वात वेगवान चेंडू होता. मागील मोसमात त्याने 16 सामन्यांत 22 बळी घेतले.

बीसीसीआयच्या करोना प्रोटोकॉलनुसार, एखादा खेळाडू किंवा सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास, तो निगेटिव्ह येईपर्यंत किमान 10 दिवस क्वारंटाइन असणे आवश्यक आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये नॉर्कियाला खेळण्याची संधी मिळाली होती. यानंतर आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी तो भारतात आला. नॉर्किया गेल्या मंगळवारी मुंबईत दाखल झाला आणि त्याने सात दिवसांचा अनिवार्य क्वारंटाइन कालावधीही पूर्ण केला. म्हणूनच तो दिल्लीचा यंदाच्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा पहिला सामना खेळू शकला नाही. या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर 7 गडी राखून एकतर्फी विजय मिळविला होता. गेल्या मोसमात दिल्लीला अंतिम फेरीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे नॉर्किया यंदाही संघात कायम होता.

दिल्लीला आपला पुढील सामना राजस्थान रॉयल्सशी 15 एप्रिलला मुंबईमध्ये खेळायचा आहे.