आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभूत झाली. मुंबई इंडियन्सने बंगळुरुसमोर १५९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. बंगळुरुने हे लक्ष्य २ गडी राखून गाठलं. या सामन्यात अष्टपैलू हार्दीक पंड्या याच्याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा होत्या. फलंदाजीत १० चेंडू खेळत १३ धावांवर असताना हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. चाहत्यांच्या पदरी निराशा पडल्याने गोलंदाजीत तो ही उणीव भरून काढेल अशी आशा होती. मात्र त्याने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी केली नाही. मात्र आता मुंबई इंडियन्सच्या ऑपरेशन डायरेक्टर झहीर खान याने खुलासा केला आहे.

‘हार्दीक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचं संघात असणं हे महत्त्वाचं आहे. मागील सामन्यांच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याला गोलंदाजी दिली नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ९ षटकं टाकली होती. फिजिओने त्याला गोलंदाजी करण्याचा न करण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या खांद्याला थोडी दुखापत आहे. मात्र तो त्यातून लवकरच बरा होईल. पुढच्या सामन्यांमध्ये हार्दीक गोलंदाजी करताना दिसेल’, असं झहीर खान याने सांगितलं.

‘या’ फिरकीपटूंना मिळाला आयपीएलमध्ये पहिलं षटक टाकण्याचा मान

‘हार्दीकच्या गैरहजेरीत वेस्टइंडिजचा अष्टपैलू कायरन पोलार्ड संघासाठी गोलंदाजीत सहावा पर्याय आहे. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. यावेळी आयपीएल स्पर्धा एकाच ठिकाणी आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा क्विटन डिकॉक आता फिट आहे. त्याने क्वारंटाइनचा अवधी पूर्ण केला आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात खेळण्यास तो सज्ज असेल’ असंही झहीर खान याने पुढे सांगितलं.

IPLदरम्यान ख्रिस गेलचे ‘जमैका टू इंडिया’ गाणे रिलीज

मुंबई इंडियन्सचा दूसरा सामना कोलकाता नाइटराइडर्ससोबत १३ एप्रिलला आहे. चेन्नईच्या एमए चिदम्बरम मैदानात हा सामना आहे. कोलकाताने हैदराबादला पहिल्या सामन्यात पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर मुंबई आपल्या पहिल्या विजयासाठी आतुर आहे.