मुंबई इंडियन्सला सातत्य राखण्यासाठी फलंदाजीची चिंता भेडसावते आहे, तर पंजाब किंग्जला सांघिक समन्वय साधता आलेला नाही. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये शुक्रवारी हे दोन्ही संघ विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला. यातून सावरण्याचे आव्हान मुंबईपुढे असेल. मुंबईने आतापर्यंत चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकले असून, दोन गमावले आहेत. दुसरीकडे, पंजाबने यंदाच्या हंगामाची सुरुवात दिमाखदार विजयानिशी केली, परंतु त्यानंतर सलग तिन्ही सामने गमावले. बुधवारी सनरायजर्स हैदाबादपुढे पंजाबचा डाव फक्त १२० धावांत गडगडला. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाबला संघरचनेतील त्रुटींवर मेहनत घ्यावी लागणार आहे.

१४-१२ मुंबई आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत २६ सामने झाले असून, यापैकी १४ सामने मुंबईने व १२ सामने पंजाबने जिंकले आहेत.

मुंबई इंडियन्स

मधल्या फळीची चिंता

रोहितने दर्जाला साजेशी फलंदाजी केली, पण अन्य फलंदाजांकडून विशेषत: मधल्या फळीने निराशा केली. आतापर्यंत गोलंदाजांनीच मुंबईला तारले होते, परंतु दिल्लीविरुद्ध याची पुनरावृत्ती झाली नाही. मोठी धावसंख्या उभारण्यात मुंबईला सातत्याने अपयश येत आहे. मागील हंगामात मुंबईच्या फलंदाजीची धुरा सांभाळणारे सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना सामना जिंकून देणारे योगदान देता आलेले नाही. याशिवाय किरॉन पोलार्डसह हार्दिक आणि कृणाल पंड्या ही मधली फळीसुद्धा धडाकेबाज फलंदाजी करू शकलेली नाही. मुंबईला फलंदाजांची लय आणि सातत्य ही प्रमुख चिंता आहे. सध्या गुणतालिकेत तळाला असलेल्या पंजाबला नमवून मुंबईला विजयाचा आत्मविश्वास मिळू शकेल.

पंजाब किंग्ज

मातब्बरांकडून अपेक्षा

पंजाबकडे मातब्बर फलंदाज आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र राहुल आणि मयांक अगरवाल हे दोघेच जण संघाला सावरत आहेत. राहुलने चार सामन्यांत दोनदा अर्धशतकी खेळी साकारली आहे, पण ख्रिस गेल मैदानावर हुकूमत गाजवू शकलेला नाही. निकोलस पूरनलाही अपेक्षांची पूर्तता करता आलेली नाही. तीन सलग पराभवामुळे पंजाबचा आत्मविश्वास हरवला आहे. संघ यातून सावरला नाही, तर बाद फेरी गाठणे त्यांना मुश्कील होईल. राहुलचे नेतृत्व संघासाठी प्रेरणादायी ठरू शकलेले नाही. दीपक हुडामध्ये गुणवत्ता आहे, परंतु सातत्याचा अभाव आहे. झाये रिचर्ड्सन आणि रिले मेरेडिथ महागडे ठरल्याने संघातील स्थान गमावले आहे. मुरुगन अश्विनच्या जागी गुणी रवी बिश्नाईला पंजाब स्थान देऊ शकेल.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोटर््स २, स्टार स्पोटर््स फस्र्ट, स्टार स्पोटर््स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)