रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आयपीएल २०२१ मध्ये सलग तीन सामने जिंकले आहेत. या विजयामध्ये ग्लेन मॅक्सवेलचा मोलाचा वाटा आहे. ग्लेन मॅक्सवेल चांगलाच फॉर्मात असून त्याने तीन सामन्यात एकूण १७६ धावा केल्या आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांना मॅक्सवेलची भीती वाटू लागली आहे. त्याला झटपट बाद करण्यासाठी रणनिती आखली जात आहे. बंगळुरुचा संघ तीन सामने चेन्नईत खेळला होता. मात्र राजस्थान विरुद्धचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात होणार आहे. या सामन्यापूर्वी ग्लेन मॅक्सवेलनं सरावादरम्यान चांगलाच घाम गाळला. तसेच बंगळुरु संघातून खेळताना घरच्यासारखं वातावरण असल्याचं सांगण्यास विसरला नाही.

‘वानखेडे मैदानात खेळताना रणनिती थोडी वेगळी असेल. या मैदानात खूप जास्त धावा झाल्या आहेत. त्यामुळे आमच्या फलंदाजांसाठी ही चांगली बाब आहे. आम्ही अधिक धावा केल्या पाहिजेत. मला पहिल्या दिवसापासून संघात घरच्यासारखं वातावरण वाटत आहे. प्रशिक्षक स्टाफ चांगलं सहकार्य करतोय. खेळाडूही एकमेकांना समजून घेत आहेत. त्यामुळे या संघाकडून खेळताना खूपच मज्जा येत आहे’, असं ग्लेन मॅक्सवेलनं सांगितलं.

IPL 2021: केकेआरचा कर्णधार ईऑन मॉर्गनला दंड

बंगळुरुने आयपीएल लिलावादरम्यान १४ कोटी २५ लाख इतकी रक्कम मोजून ग्लेन मॅक्सवेलला संघात सहभागी करून घेतलं आहे. ग्लेन मॅक्सवेलची आयपीएलमधील कामगिरी पाहता मोजलेली किंमत योग्यच आहे असं दिसतंय. गेल्या आयपीएल पर्वात ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे इतकी मोठी रक्कम मोजल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र बंगळुरुचा हा निर्णय योग्य होता हे ग्लेन मॅक्सवेलनं आपल्या फलंदाजीतून पटवून दिलं आहे.