आजपासून आयपीएलच्या चौदाव्या मोसमाची सुरुवात होत आहे. उद्घाटनाच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हो दोन संघ चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आमने सामने असतील. या सामन्याद्वारे मुंबईचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड दोन द्विशतके आपल्या नावावर करू शकतो.

200 षटकारांचा विक्रम

आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकण्यापासून पोलार्ड दोन पावले दूर आहे. पोलार्डने 164 सामन्यात 198 षटकार ठोकले आहेत. जर, त्याला आज आरसीबीविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाली, तर तो या खास विक्रमाला गवसणी घालू शकतो. पोलार्डने आज 2 षटकार ठोकले, तर तो आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणारा सहावा खेळाडू ठरेल.
पोलार्डपूर्वी, ख्रिस गेल (349), एबी डिव्हिलियर्स (235), एमएस धोनी (216), रोहित शर्मा (213) आणि विराट कोहली (201) यांनी आयपीएलमध्ये 200 षटकारांची रेखा ओलांडली आहे.

200 चौकारांचा विक्रम

षटकाराच्या विक्रमाशिवाय, पोलार्ड आयपीएलमध्ये 200 चौकारांच्या जवळ पोहोचला आहे. त्याच्या खात्यात आता 196 चौकार आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये 300 बळी घेण्यापासू पोलार्ड 7 बळी दूर आहे. जर पोलार्डने यंदाच्या आयपीएलमध्ये ही कामगिरी केली, तर तो टी-20 क्रिकेटमध्ये 5000 पेक्षा जास्त धावा आणि 300 पेक्षा जास्त बळी घेणारा चौथा अष्टपैलू खेळाडू ठरेल. त्याच्यापूर्वी, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल यांनी हा विक्रम रचला आहे.

रोहितलाही मोठ्या विक्रमाची संधी

पोलार्डशिवाय मुंबईचा कर्णधार रोहितकडेही मोसमातील पहिल्या सामन्यात विशेष विक्रम करण्याची संधी आहे. रोहितने आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 25 धावा फटकावल्या, तर डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरेल. आयपीएलमधील सर्वाधिक धावांच्या बाबतीत रोहित सध्या 5239 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे, तर वॉर्नरने 5254 धावा केल्या आहेत.