क्रिकेटपटू आणि अंधश्रद्धा यांचे खूप जुने नाते आहे. सामन्याआधी एखाद्या अनुभवी खेळाडूने अंधश्रद्धेवर अवलंबून असणे हे खूप सामान्य मानले जाते. आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सचे खेळाडू आंद्रे रसेल आणि शिवम मावी या दोघांनीही आपण अंधश्रद्धाळू असल्याचे कबूल केले आहे. सामना सुरू होण्यापूर्वी हे खेळाडू काय करतात, याबद्दल त्यांनी सांगितले आहे.

केकेआरने त्यांच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हि़डिओ शेअर केला आहे. यात रसेल आणि मावी यांनी आपल्या क्रिकेटच्या बाबतीत असलेल्या अंधश्रद्धा सांगितल्या आहेत. रसेल म्हणाला, ”हो, मी अंधश्रद्धाळू आहे. प्रत्येक खेळाडू असतो. सामन्यासाठी जाताना मी माझा डावा पाय मैदानात पहिला ठेवतो, तसेच गोलंदाजाचा सामना करण्यापूर्वी मी खेळपट्टीवर बॅट चार वेळा ठोकतो. मी जर असे नाही केले, तर मला वाटते की चेंडू चांगल्या प्रकारे खेळू शकत नाही.”

 

शिवम मावीही आहे अंधश्रद्धाळू

रसेलनंतर कोलकाता संघाचा युवा वेगवान गोलंदाज शिवम मावी म्हणाला, ”सामन्यासाठी जाताना मी माझा उजवा पाय मैदानात पहिला ठेवतो.” मावीच्या या प्रतिक्रियेवर रसेलही हसला. यंदाची आयपीएल स्पर्धा कोलकातासाठी अद्याप चांगली गेलेली नाही. पहिला सामना जिंकल्यानंतर केकेआरने पराभवाची हॅट्ट्रिक नोंदवली. शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाताला मात दिली. रसेलने चेन्नईविरुद्ध वादळी अर्धशतक ठोकले.