अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या १४व्या पर्वाचा पहिला सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाताने ५ गडी राखून पंजाबवर विजय मिळवला. नाणेफेक जिंकलेल्या कोलकाताने पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. प्रसिध कृष्णा, पॅट कमिन्स आणि सुनील नरिन यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबला २० षटकात ९ बाद १२३ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने आपले पाच गडी गमावले, पण कर्णधार ईऑन मॉर्गनच्या चिवट खेळीमुळे त्यांना १७व्या षटकात विजय मिळवता आला. मॉर्गनने ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४७ धावांची खेळी केली. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

कोलकाताचा डाव

पंजाबच्या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात मोझेस हेन्रिक्सने नितीश राणाला शून्यावर बाद केले. पुढच्याच षटकात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शुबमन गिलला पायचित पकडले. गिल पुन्हा अपयशी ठरला, त्याला ९ धावा केल्या. मैदानात आलेला सुनील नरिन तिसऱ्या षटकात माघारी परतला. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर त्याच्या रवी बिश्नोईने सुंदर झेल टिपला. नरिनला भोपळाही फोडता आला नाही. पहिल्या पॉवरप्लेपर्यंत कोलकाताला ३ बाद ४२ धावा करता आल्या. त्यानंतर कर्णधार ईऑन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठीने संघाला सावरले. या दोघांनी ३५ चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. ११व्या षटकात आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या राहुल त्रिपाठीला दीपक हुडाने माघारी धाडले. त्रिपाठीने ७ चौकरांसह ४१ धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेला आंद्रे रसेलही अपयशी ठरला. १५व्या षटकात तो धावबाद झाला. रसेलला १० धावा करता आल्या. रसेलनंतर मैदानात आलेल्या दिनेश कार्तिकने १७व्या षटकात चौकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केले.

पंजाबचा डाव

पंजाबकडून कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली. ५ षटकात पंजाबने २९ धावा फलकावर लावल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात राहुल माघारी परतला. त्याला पॅट कमिन्सने झेलबाद केले. राहुलला १९ धावा करता आल्या. पॉवरप्लेमध्ये पंजाबने ६ षटकात १ बाद ३७ धावा केल्या. राहुलनंतर आलेले ख्रिस गेल आणि दीपक हुडा हे दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. शिवम मावीने गेलला शून्यावर, तर प्रसिध कृष्णाने हुडाला एका धावेवर माघारी धाडले. त्यानंतर मयंक आणि निकोलस पूरन यांनी पंजाबचे अर्धशतक पूर्ण केले. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मंयकला नरिनने राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद केले.  मयंकने ३१ धावांचे योगदान दिले. मयंकनंतर आलेला मोझेस हेन्रिक्सही काही खास करू शकला नाही. नरिनचा तो दुसरा बळी ठरला.

वरुण चक्रवर्तीने १५व्या षटकात पंजाबला अजून एक धक्का दिला. चक्रवर्तीने निकोलस पूरनची दांडी गुल केली. पूरनला १९ धावा करता आल्या. शंभर धावांच्या आत पंजाबने शाहरुख खानलाही गमावले. प्रसिध कृष्णाने  शाहरुखला वैयक्तिक १३ धावांवर बाद केले. पंजाबने १९व्या षटकात शतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात ख्रिस जॉर्डनने केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबला १२० धावा ओलांडता आल्या. जॉर्डनने १८ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह ३०धावा केल्या. कोलकाताकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक ३ बळी घेतले. सुनील नरिन आणि कमिन्सला प्रत्येकी २ बळी मिळाले.