आयपीएलमध्ये आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आमने सामने येणार आहेत. मुंबई इंडियन्सला सातत्य राखण्यासाठी फलंदाजीची चिंता भेडसावते आहे, तर पंजाब किंग्जला सांघिक समन्वय साधता आलेला नाही. त्यामुळे आज दोन्ही संघ विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.

कृणाल पंड्या आणि दीपक हुडाचे भांडण

या सामन्याची अजून एक उत्सुकता लागून राहण्याचे कारण म्हणजे मुंबईचा कृणाल पंड्या आणि पंजाबचा दीपक हुडा. या सामन्याच्या माध्यमातून हे दोघेही आज समोरासमोर उभे ठाकतील. यंदाच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेपूर्वी दीपक हुडा कृणाल पंड्यासोबतच्या भांडणामुळे चर्चेत आला होता. या भांडणामुळे हुडाला बडोदा संघातून निलंबित करण्यात आले. निलंबनामुळे दीपक हुडा यावर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी खेळू शकला नाही. मात्र आज हे दोघे आमनेसामने असतील. क्रिकेटच्या मैदानावर या दोन खेळाडूंमधील लढाईची चाहतेदेखील आतुरतेने वाट पाहत आहेत. कोणावर कोणता खेळाडू भारी पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

राजस्थान रॉयल्सविरूद्ध हुडा आक्रमक

आयपीएल २०२१मध्ये राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या पहिल्या सामन्यात दीपक हुडाने आक्रमक फलंदाजी केली होती. पंजाब किंग्जसाठी हुडाने २८ चेंडूंत झटपट ६४ धावा फटकावल्या. त्याची ही खेळी पंजाबसाठी निर्णायक ठरली आणि पंजाबने राजस्थानवर ४ धावांनी विजय मिळवला.

मुंबई-पंजाब आकडेवारी

मुंबई आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत २६ सामने झाले असून, यापैकी १४ सामने मुंबईने व १२ सामने पंजाबने जिंकले आहेत.