चेन्नई सुपरकिंग्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये नवीन जर्सीमध्ये दिसणार आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काल संघाच्या नव्या जर्सीचं अनावरण केलं. नंतर चेन्नई सुपर किंग्सने जर्सी अनावरण करतानाचा धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन याबाबत माहिती दिली. त्यावर चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने मजेशीर रिप्लाय दिला.

तीनदा आयपीएलचा खिताब आपल्या नावावर करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई संघाने २००८ मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केला. चेन्नईच्या जर्सीचा रंग आधीप्रमाणेच पिवळा आहे, पण खांद्यावर भारतीय लष्कराचा सन्मान म्हणून आर्मीच्या ‘कॅमोफ्लॉज’चा समावेश करण्यात आला आहे. शिवाय फ्रँचायझीच्या ‘लोगो’च्या वरती तीन स्टार आहेत, 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएलचा खिताब जिंकल्याचं हे तीन स्टार दर्शवतात. ही जर्सी लाँच करतानाचा एक व्हिडिओ सीएसकेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. त्यावर लगेचच जडेजाने रिप्लाय दिला. “माझ्यासाठी लार्ज साइजची जर्सी ठेवून द्या प्लिज”, अशा आशयाचा रिप्लाय जडेजाने केला होता. त्याच्या रिप्लायवर सीएसकेनेही प्रत्युत्तर दिलं. “नक्कीच सर, तुमच्यासाठी एक राखून ठेवली आहे. थेट मुंबईला त्या जर्सीची डिलिव्हरी होईल, आम्हाला लवकरच जॉइन करा”, असा मजेशीर रिप्लाय सीएसकेने दिला.

आणखी वाचा- IPL मध्ये पहिल्यांदाच चेन्नईची जर्सी बदलली, खांद्यावर दिसेल लष्कराचा ‘कॅमोफ्लॉज’; धोनीने केलं अनावरण

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चेन्नईत सुरु असलेला सीएसकेचा ट्रेनिंग कॅम्प आता मुंबईत हलवण्यात आला आहे. 26 मार्चपासून सीएसकेचा मुंबईत ट्रेनिंग कॅम्प सुरू होईल. मुंबईतच त्यांचा आयपीएलचा पहिला सामना होणार आहे.