News Flash

IPL 2021 :विजयी सातत्य राखण्यासाठी मुंबई इंडियन्स उत्सुक

सनरायजर्स हैदराबादला नमवून विजयी कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने मुंबईचा संघ मैदानात उतरेल.

| May 4, 2021 04:20 am

नवी दिल्ली : विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सने मागील दोन सामने जिंकून पुन्हा एकदा लय प्राप्त केली आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मंगळवारी होणाऱ्या लढतीत तळाच्या सनरायजर्स हैदराबादला नमवून विजयी कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने मुंबईचा संघ मैदानात उतरेल.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने सात सामन्यांत चार विजय मिळवले असून गेल्या लढतीत किरॉन पोलार्डच्या कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जवर सरशी साधल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसरीकडे गुणतालिकेत आठव्या स्थानी असणाऱ्या हैदराबादला आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकता आल्याने बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी उर्वरित सात लढतींपैकी त्यांना किमान सहा सामने जिंकणे अनिवार्य आहे. त्याशिवाय उभय संघांतील पहिल्या टप्प्यातील लढतीत मुंबईने हैदराबादवर विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाही मुंबईचेच पारडे जड मानले जात आहे.

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून भारताला आर्थिक मदत

’ मेलबर्न : भारतातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’नेसुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी भारताला ५०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर (२८ लाख) इतकी रक्कम देण्याचे ठरवले असून ‘युनिसेफ’ फाऊंडेशनसह आणखी आर्थिक साहाय्य करण्याची इच्छाही ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत संभ्रम कायम

’ मेलबर्न : ‘आयपीएल’मध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसाठी मायदेशी परतण्याकरिता विशेष विमान पुरवण्याबाबत सध्या कोणतीही योजना आखलेली नाही, असे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉक्ले यांनी सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे ३० मे रोजी अंतिम सामना झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू कसे माघारी परतणार, याविषयीचा संभ्रम अद्याप कायम आहे. ‘‘ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेशी आमचा सातत्याने संवाद सुरू आहे. ‘बीसीसीआय’ने सर्व खेळाडूंची पूर्ण जबाबदारी घेतली असल्याने तूर्तास ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी विशेष विमान सेवा पुरवण्याचा आम्ही विचार केलेला नाही,’’ असे हॉक्ले म्हणाले.

सनरायजर्स हैदराबाद : वॉर्नर किंवा रॉयला संधी?

नूतन कर्णधार केन विल्यम्सन राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत फलंदाजी आणि नेतृत्व अशा दोन्ही आघाडय़ांवर अपयशी ठरला. हैदराबादच्या फलंदाजीतील त्रुटी सर्वाना ठाऊक असल्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर किंवा इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय यांना सलामीला संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. भुवनेश्वर कुमार आणि रशिद खान यांच्या षटकांचा योग्यरीतीने वापर करणे हैदराबादसाठी महत्त्वाचे आहे. खलिल अहमद, संदीप शर्मा आणि विजय शंकर सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे हैदराबादच्या संघात अनेक बदल अपेक्षित आहेत.

मुंबई इंडियन्स :  मधल्या फळीला सूर गवसला

मुंबईला सुरुवातीच्या काही सामन्यांत मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश भेडसावत होते. परंतु पोलार्डसह हार्दिक आणि कृणाल पंडय़ा यांनाही सूर गवसल्याचे गेल्या लढतीत दिसून झाले. त्यामुळे मुंबईचा संघ अधिक धोकादायक ठरू शकतो. रोहित (२५० धावा) आणि क्विंटन डीकॉक (१५५) यांच्याकडून मुंबईला आणखी एका दमदार सलामीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्ट यांची अनुभवी जोडी गेल्या सामन्यातील सुमार कामगिरीला विसरून झोकात पुनरागमन करतील, अशी आशा आहे. मुंबईसाठी आतापर्यंत सर्वाधिक ११ बळी मिळवणाऱ्या राहुल चहरवर फिरकीची मदार असेल.

* वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

 

किरॉन पोलार्ड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 3:39 am

Web Title: ipl 2021 match preview mumbai indians vs sunrisers hyderabad zws 70
टॅग : IPL 2021
Next Stories
1 IPL २०२१ : दिल्लीतील सामने थांबवावेत, उच्च न्यायालयात याचिका दाखल
2 पॅट कमिन्सने पंतप्रधान सहायता निधीला देणगी देण्याचा निर्णय बदलला!
3 IPL २०२१ बंद होणार? BCCIच्या अधिकाऱ्यानं दिलं ‘हे’ उत्तर
Just Now!
X