पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान आयपीएल २०२१चा २९वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालने नाबाद ९९ धावा केल्या आणि संघाला २० षटकांत १६६ धावा जमवण्यात योगदान दिले. या सामन्यात मयंकला शतक पूर्ण करता आले नाही, पण त्याने एका विक्रमात आपले नाव नोंदवले.

९९ धावांची नाबाद खेळी करणारा मयंक आयपीएल इतिहासातील तिसरा खेळाडू ठरला. सुरेश रैना आणि ख्रिस गेल यांनी लीगमध्ये ९९ धावांची नाबाद खेळी केली आहे.

 

या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबचा नियमित कर्णधार केएल राहुल आजारामुळे रूग्णालयात दाखल आहे आणि त्यामुळे मयंक अग्रवालने आज संघाचे नेतृत्व केले.

पंजाबचा डाव

राहुलच्या अनुपस्थितीत प्रभासिमरन सिंगसह कर्णधार मयंक अग्रवालने सलामी दिली. मात्र, दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने प्रभासिमरनला वैयक्तिक १२ धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. पॉवरप्लेमध्ये पंजाबने ख्रिस गेललाही गमावले. रबाडाने त्याचा त्रिफळा उडवला. आज पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या डेव्हिड मलानने अग्रवालसोबत भागीदारी रचली. या दोघांनी पंजाबसाठी अर्धशतकी भागीदारी उभारली. दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेलने मलानची दांडी गुल करत पंजाबला तिसरा धक्का दिला. मलान बाद झाल्यानंतर मयंकला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही, त्याने एका बाजुने संघाला सावरले. वेगवान गोलंदाज आवेश खानने टाकलेल्या २०व्या षटकात पंजाबने २३ धावा वसूल केल्या. या धावांमुळे पंजाबला दीडशेपार जाता आले. मयंकने ५८ चेंडूत ८ चौकार आणि ४ चौकारांसह ९९ धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ४ षटकात ३६ धावा देत सर्वाधिक ३ बळी टिपले. आवेश खान आणि अक्षरला प्रत्येकी एक बळी घेता आला.