रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने चेन्नईत पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करत त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 5 बाद 150 धावा केल्या. मु्ंबईकडून रोहित शर्मा, क्विंटन डि कॉक आणि कायरन पोलार्ड यांनी उपयुक्त योगदान दिले. प्रत्युत्तरात हैदराबादच्या जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या सलामी जोडीने दमदार सुरुवात करून दिली. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत हैदराबादचा डाव 137 धावांवर संपुष्टात आणला.

हैदराबादचा डाव

मुंबईच्या 151 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी दणक्यात सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेदरम्यान ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिल्ने या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पॉवरप्लेमध्ये हैदराबादच्या 57 धावा फलकावर लागल्या होत्या. त्यानंतर फिरकीपटू कृणाल पंड्याने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. कृणालच्या चेंडूवर फटका खेळताना जॉनी बेअरस्टो 8व्या षटकात हिट विकेटचा शिकार ठरला. बेअरस्टोने 22 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 43 धावा केल्या. बेअरस्टो बाद झाल्यानंतर रोहित शर्माने फिरकीपटू राहुल चहरला गोलंदाजीला बोलावले. त्याने बेअरस्टोनंतर आलेल्या मनीष पांडेला पोलार्डकरवी झेलबाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. पांडेला फक्त 2 धावाच करता आल्या.

त्यानंतर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर 12व्या षटकात चोरटी धाव घेताना धावबाद झाला. हार्दिक पंड्याने यष्ट्यांवर आपला अचूक थ्रो मारत वॉर्नरला माघारी धाडले. वॉर्नरने 36 धावांची खेळी केली. यानंतर मात्र, हैदराबादच्या डावाला उतरती कळा लागली. मधल्या फळीत विजय शंकरने थोडा प्रतिकार केला. मात्र डावाच्या शेवटी तोही दबावात बाद झाला. मुंबईकडून राहुल चहरने अप्रतिम फिरकी गोलंदाजीचे प्रदर्शन करत 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय, बोल्टलाही 3 बळी घेता आले.

मुंबईचा डाव

फलंदाजीचा निर्णय घेऊन रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईसाठी चांगली सुरुवात केली. या दोघांनी 55 धावांची भागीदारी उभारली. पॉवरप्लेच्या 6 षटकात मुंबईने बिनबाद 53 धावा केल्या. रोहितने आक्रमक तर क्विंटनने संयमी खेळी करत त्याला साथ दिली. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित शर्मा विजय शंकरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रोहितने 2 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवलाही शंकरने तंबूचा मार्ग दाखवला. वॉर्नरने राशिद खान आणि मुजीब उर रेहमान यांना गोलंदाजीसाठी पाचारण करत मु्ंबईची धावगती रोखली. शतकाकडे कूच करताना मुंबईने डि कॉकला गमावले. मुजीबने त्याला वैयक्तिक 40 धावांवर बाद केले. दुसऱ्या बाजूला संथ खेळणारा ईशान किशनही दबावात बाद झाला. किशनने 21 चेंडूत फक्त 12 धावा केल्या.

त्यानंतर कायरन पोलार्डने मोर्चा सांभाळला. एकेरी, दुहेरी धावा, कधीकधी मोठे फटके यांचे मिश्रण साधत त्याने मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला. भुवनेश्वरने हैदराबादसाठी टाकलेल्या शेवटच्या षटकात पोलार्डने दोन षटकार खेचत मुंबईला दीडशे धावांचा आकडा गाठून दिला. पोलार्ड 22 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 35 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून विजय शंकर आणि मुजीब उर रेहमान यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर, खलील अहमदला 1 बळी घेता आला.

प्लेईंग XI

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह.

सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, अभिषेक शर्मा, विराट सिंह, विजय शंकर, जॉनी बेअरस्टो, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि मुजीब उर रहमान.

Live Blog

23:18 (IST)17 Apr 2021
मुंबईचा हैदराबादवर 13 धावांनी विजय

ट्रेंट बोल्टने टाकलेल्या शेवटच्या षटकात भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमद यांना माघारी धाडत हैदराबादचा डाव 137 धावांवर संपुष्टात आणला.

23:09 (IST)17 Apr 2021
हैदराबादची विजयाची आशा मावळली

धावांचे अंतर कमी करण्यासाठी बुमराहच्या चेंडूवर  मोठा फटका खेळताना हैदराबादचा विजय शंकर झेलबाद झाला. त्याने 28 धावांची खेळी केली. 

23:03 (IST)17 Apr 2021
18व्या षटकात हैदराबादला दुहेरी धक्के

ट्रेंट बोल्टच्या 18व्या षटकात हार्दिक पंड्याने अब्दुल समदला धावबाद केले. चोरटी धाव घेतना समद धावबाद झाला. याच षटकात बोल्टने राशिदला पायचित पकडत हैदराबादला सातवा धक्का दिला. 

22:49 (IST)17 Apr 2021
हैदराबादला शेवटच्या 4 षटकात 31 धावांची गरज

हैदराबादला विजयासाठी शेवटच्या 4 षटकात 31 धावांची गरज आहे. खेळपट्टीवर विजय शंकर आणि अब्दुल समद फलंदाजी करत आहेत.

22:42 (IST)17 Apr 2021
हैदराबादचा पाय खोलात

मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने विराट सिंह आणि अभिषेक शर्मा या दोन फलंदाजांना एकाच षटकात बाद करत हैदराबादला बॅकफूटवर ढकलले. हैदराबादच्या 15 षटकात 5 बाद 104 धावा झाल्या आहेत. चहरने त्याच्या 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले.

22:26 (IST)17 Apr 2021
हैदराबादला मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नर धावबाद

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर 12व्या षटकात चोरटी धाव घेताना धावबाद झाला. हार्दिक पंड्याने यष्ट्यांवर आपला अचूक थ्रो मारत वॉर्नरला माघारी धाडले. वॉर्नरने 36 धावांची खेळी केली. 12 षटकात हैदराबादने 3 बाद 92 धावा केल्या.

22:11 (IST)17 Apr 2021
मनीष पांडे स्वस्तात बाद

बेअरस्टो बाद झाल्यानंतर रोहित शर्माने फिरकीपटू राहुल चहरला गोलंदाजीला बोलावले. त्याने बेअरस्टोनंतर आलेल्या मनीष पांडेला पोलार्डकरवी झेलबाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. पांडेला फक्त 2 धावाच करता आल्या.

22:04 (IST)17 Apr 2021
सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का, बेअरस्टो बाद

फिरकीपटू कृणाल पंड्याच्या चेंडूवर फटका खेळताना जॉनी बेअरस्टो आठव्या षटकात हिट विकेटचा शिकार ठरला. बेअरस्टोने 22 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 43 धावा केल्या.

21:57 (IST)17 Apr 2021
पॉवरप्लेमध्ये हैदराबादच्या 57 धावा

पॉवरप्लेमध्ये हैदराबादने बिनबाद 57 धावा केल्या. 

21:49 (IST)17 Apr 2021
5 षटकात हैदराबादच्या बिनबाद 55 धावा

जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार अर्धशतकी भागीदारी रचली. पहिल्या 5 षटकात या दोघांनी हैदराबादसाठी 55 धावा केल्या.

21:45 (IST)17 Apr 2021
बोल्टनंतर पदार्पणवीर मिल्नेचे महागडे षटक

बोल्टनंतर आज पदार्पण केलेला अॅडम मिल्नेवर हैदराबादच्या सलामीवीरांनी हल्ला चढवला. त्यांनी मिल्नेला पहिल्याच षटकात 19 धावा चोपल्या.

21:38 (IST)17 Apr 2021
ट्रेंट बोल्टचे महागडे षटक

बोल्टचे दुसरे षटक चांगलेच महागडे ठरले. जॉनी बेअरस्टोने या षटकात बोल्टला 18 धावा कुटल्या. 3 षटकात हैदराबादने बिनबाद 23 धावा केल्या.

21:25 (IST)17 Apr 2021
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजीला सुरुवात

कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी सनरायझर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात केली आहे. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने पहिले षटक टाकले. 

21:09 (IST)17 Apr 2021
मुंबईच्या 20 षटकात 5 बाद 150 धावा

शेवटच्या षटकात कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने 20 षटकात 5 बाद 150 धावा केल्या. पोलार्ड 22 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 35 धावांवर नाबाद राहिला.

21:02 (IST)17 Apr 2021
मुंबईला पाचवा धक्का

सामन्याच्या 19व्या षटकात मुंबईला पाचवा धक्का बसला. हार्दिक पंड्याला खलील अहमदने झेलबाद केले. हार्दिकला 7 धावाच करता आल्या.

20:52 (IST)17 Apr 2021
ईशान किशन माघारी

17व्या षटकात मुंबईला चौथा धक्का बसला. मुजीब उर रेहमानने किशनला बेअरस्टोकरवी झेलबाद केले. किशनने 21 चेंडूत 12 धावांची संध खेळी केली. 

20:36 (IST)17 Apr 2021
मुंबईला तिसरा धक्का, क्विंटन डि कॉक बाद

मुजीब उर रहमानने 14व्या षटकात मुंबईचा सलामीवीर डि कॉकला बाद केले. धावगती मंदावली असताना मोठा फटका खेळण्याच्या नादात डि कॉक पर्यायी खेळाडू सुचितकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 5 चौकारांसह 40 धावा केल्या. 14 षटकापर्यंत मुंबईने 3 बाद 98 धावा केल्या.

20:13 (IST)17 Apr 2021
विजय शंकरचा दुसरा बळी

विजय शंकरने 9व्या षटकात मुंबईला दुसरा धक्का दिला. मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला त्याने आपल्याच चेंडूवर झेलबाद केले. सूर्यकुमारने 10 धावा केल्या. मुंबईने 8.3 षटकात 2 बाद 71 धावा केल्या.

20:03 (IST)17 Apr 2021
मुंबईला पहिला धक्का, हिटमॅन बाद

विजय शंकरने हैदराबादसाठी टाकलेल्या 7व्या षटकात रोहित शर्मा विराट सिंहकडे झेल देऊन बाद झाला. रोहितने 2 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावा केल्या.

19:59 (IST)17 Apr 2021
रोहित-क्विंटनची अर्धशतकी भागीदारी

मुंबईच्या सलामीवीरांनी 33 चेंडूत अर्धशतकील भागीदारी पूर्ण केली. तर, टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहितने 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. 6 षटकात मुंबईने बिनबाद 53 धावा केल्या.

19:55 (IST)17 Apr 2021
रोहित-क्विंटनची दमदार सुरुवात

पहिल्या 5 षटकात मुंबईने बिनबाद 48 धावा फलकावर लावल्या. रोहित शर्माने आक्रमक फलंदाजाचे रूप धारण करत धावा कुटल्या. रोहित 27 तर डि कॉक 15 धावांवर नाबाद आहे.

19:34 (IST)17 Apr 2021
डि कॉकची उत्तम सुरुवात

भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच चेंडूवर मुंबईचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डि कॉकने चौकार ठोकत उत्तम सुरुवात केली. पहिल्या षटकात मुंबईने बिनबाद 8 धावा केल्या.

19:13 (IST)17 Apr 2021
दोन्ही संघांची प्लेईंग XI

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह.सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, अभिषेक शर्मा, विराट सिंह, विजय शंकर, जॉनी बेअरस्टो, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि मुजीब उर रहमान.

19:06 (IST)17 Apr 2021
मुंबई संघात एक बदल

मुंबईने आज मार्को जानसेनला बसवून अ‌ॅडम मिल्नेला संघात स्थान दिले आहे. तर हैदराबादनेही संघात चार बदल केले आहेत.

19:03 (IST)17 Apr 2021
मुंबईने जिंकली नाणेफेक

नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.