News Flash

MI vs SRH : मुंबईच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी, हैदराबादवर 13 धावांनी केली मात

सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाची हॅट्ट्रिक

मुंबई इंडियन्स

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने चेन्नईत पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करत त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 5 बाद 150 धावा केल्या. मु्ंबईकडून रोहित शर्मा, क्विंटन डि कॉक आणि कायरन पोलार्ड यांनी उपयुक्त योगदान दिले. प्रत्युत्तरात हैदराबादच्या जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या सलामी जोडीने दमदार सुरुवात करून दिली. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत हैदराबादचा डाव 137 धावांवर संपुष्टात आणला. मुंबईच्या पोलार्डला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

 

हैदराबादचा डाव

मुंबईच्या 151 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी दणक्यात सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेदरम्यान ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिल्ने या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पॉवरप्लेमध्ये हैदराबादच्या 57 धावा फलकावर लागल्या होत्या. त्यानंतर फिरकीपटू कृणाल पंड्याने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. कृणालच्या चेंडूवर फटका खेळताना जॉनी बेअरस्टो 8व्या षटकात हिट विकेटचा शिकार ठरला. बेअरस्टोने 22 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 43 धावा केल्या. बेअरस्टो बाद झाल्यानंतर रोहित शर्माने फिरकीपटू राहुल चहरला गोलंदाजीला बोलावले. त्याने बेअरस्टोनंतर आलेल्या मनीष पांडेला पोलार्डकरवी झेलबाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. पांडेला फक्त 2 धावाच करता आल्या.

त्यानंतर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर 12व्या षटकात चोरटी धाव घेताना धावबाद झाला. हार्दिक पंड्याने यष्ट्यांवर आपला अचूक थ्रो मारत वॉर्नरला माघारी धाडले. वॉर्नरने 36 धावांची खेळी केली. यानंतर मात्र, हैदराबादच्या डावाला उतरती कळा लागली. मधल्या फळीत विजय शंकरने थोडा प्रतिकार केला. मात्र डावाच्या शेवटी तोही दबावात बाद झाला. मुंबईकडून राहुल चहरने अप्रतिम फिरकी गोलंदाजीचे प्रदर्शन करत 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय, बोल्टलाही 3 बळी घेता आले.

मुंबईचा डाव

फलंदाजीचा निर्णय घेऊन रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईसाठी चांगली सुरुवात केली. या दोघांनी 55 धावांची भागीदारी उभारली. पॉवरप्लेच्या 6 षटकात मुंबईने बिनबाद 53 धावा केल्या. रोहितने आक्रमक तर क्विंटनने संयमी खेळी करत त्याला साथ दिली. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित शर्मा विजय शंकरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रोहितने 2 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवलाही शंकरने तंबूचा मार्ग दाखवला. वॉर्नरने राशिद खान आणि मुजीब उर रेहमान यांना गोलंदाजीसाठी पाचारण करत मु्ंबईची धावगती रोखली. शतकाकडे कूच करताना मुंबईने डि कॉकला गमावले. मुजीबने त्याला वैयक्तिक 40 धावांवर बाद केले. दुसऱ्या बाजूला संथ खेळणारा ईशान किशनही दबावात बाद झाला. किशनने 21 चेंडूत फक्त 12 धावा केल्या.

त्यानंतर कायरन पोलार्डने मोर्चा सांभाळला. एकेरी, दुहेरी धावा, कधीकधी मोठे फटके यांचे मिश्रण साधत त्याने मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला. भुवनेश्वरने हैदराबादसाठी टाकलेल्या शेवटच्या षटकात पोलार्डने दोन षटकार खेचत मुंबईला दीडशे धावांचा आकडा गाठून दिला. पोलार्ड 22 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 35 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून विजय शंकर आणि मुजीब उर रेहमान यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर, खलील अहमदला 1 बळी घेता आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 11:32 pm

Web Title: ipl 2021 mi won by 13 runs over srh in chennai adn 96
टॅग : IPL 2021
Next Stories
1 खरा Hit Man… रोहित शर्माने धोनीला मागे टाकत स्वत:च्या नावावर नोंदवला अनोखा विक्रम
2 MI vs SRH IPL 2021 Live Update : चेन्नईत हैदराबादच्या पराभवाची हॅट्ट्रिक
3 MI vs SRH : एकाच विक्रमापासून पोलार्ड 2, तर वॉर्नर 5 पावले दूर!
Just Now!
X