आयपीएलचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार पहिल्याच दिवशी म्हणजेच १९ तारखेला पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद पटकावलेला चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात टक्कर होणार आहे. बीसीसीआयने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, उर्वरित हंगामाचा पहिला सामना दुबईमध्ये खेळला जाईल. हंगामातील उर्वरित ३१ सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन ठिकाणी खेळले जातील. १५ ऑक्टोबर रोजी दुबई येथे अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला पात्रता सामना १० ऑक्टोबरला दुबईमध्ये, तर एलिमिनेटर व दुसरा पात्रता सामना शारजाह येथे खेळला जाईल. हे सामने अनुक्रमे ११ आणि १३ ऑक्टोबर रोजी होऊ शकतात.

 

हेही वाचा – Tokyo 2020 : ‘‘२२ कोटींच्या पाकिस्तानातून फक्त १० खेळाडू”, माजी क्रिकेटपटू संतापला

अनेक संघांमध्ये करोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर आयपीएलचे १४वे सत्र ४ मे रोजी तहकूब करण्यात आले. २ मे पर्यंत एकूण २९ सामने खेळले गेले. आयपीएल स्थगित होईपर्यंत दिल्ली कॅपिटल्सने आठ सामन्यांमधून सहा विजयांसह आघाडी घेतली. तर चेन्नई सुपर किंग्ज पाच विजयांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा कर्णधार असलेला आरसीबी पाच विजयांसह तिसर्‍या स्थानावर आहे.