करोनामुळे स्थगित झालेला आयपीएलचा २०२१ हंगाम आजपासून पुन्हा सुरू झाला आहे. भारतात पार पडलेल्या पूर्वाधातील पराभवाचा वचपा काढत चेन्नई  सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला दुबईच्या मैदानावर २० धावांनी मात दिली आहे. नाणेफेक जिंकलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. चेन्नईचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने नाबाद ८८ धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. मुंबईकडून सौरभ तिवारीने नाबाद ५० धावांची खेळी केली, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत १२ गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईचा डाव

मुंबईकडून पदार्पणवीर अनमोलप्रीत सिंग आणि  क्विंटन डी कॉक यांनी सलामी दिली. आक्रमक सुरुवात केलेल्या क्विंटन डी कॉकला दीपक चहरने पायचित पकडले. डी कॉकने १७ धावा केल्या. दीपक चहरने सुंदर फटके खेळलेल्या अनमोलप्रीतची दांडी गुल करत त्याला तंबूचा मार्ग दाखवला, अनमोलने १६ धावा केल्या.  सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्या हे स्टार फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. सौरभ तिवारीने ५ चौकारांसह नाबाद ५० धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. चेन्नईचा अनुभवी गोलंदाज ड्वेन ब्राव्होने २५ धावांत ३ बळी घेत मुंबईच्या डावाला सुरूंग लावला. दीपक चहरने २ बळी घेत ब्राव्होला उत्तम साथ दिली.

चेन्नईचा डाव

चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी दिली. मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिल्ने यांनी तिखट मारा करत चेन्नईची पहिल्या पॉवरप्लेमध्ये अवस्था ४ बाद २४ अशी केली. डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ऋतुराज आणि रवींद्र जडेजा यांनी भागीदारी रचत चेन्नईच्या डावाला आकार दिला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर ऋतुराजने आक्रमक फटके खेळायला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने जडेजाला झेलबाद करत ही भागीदारी तोडली. गायकवाड-जडेजा यांनी ८१ धावांची भागीदारी केली, जडेजाने २६ धावा केल्या. त्याच्यानंतर ड्वेन ब्राव्हो फलंदाजीसाठी मैदानात आला. ७ चेंडूत २३ धावांची खेळी करून ब्राव्हो शेवटच्या षटकात झेलबाद झाला. त्याने ३ षटकार ठोकले. ऋतुराजने ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८८ धावा ठोकत चेन्नईला २० षटकात ६ बाद १५६ धावा अशी धावसंख्या गाठून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ५६ धावा केल्या. ऋतुराजने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन –

मुंबई इंडियन्स – अनमोलप्रीत सिंग, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड (कर्णधार), सौरभ तिवारी, कृणाल पंड्या, अॅडम मिल्ने, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू, मोईन अली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर आणि जोश हेझलवूड.

Live Blog

Highlights

    23:24 (IST)19 Sep 2021
    चेन्नईचा मुंबईवर 'सुपर' विजय

    आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर २० धावांनी सरशी साधली. ब्राव्होने २५ धावांत ३ बळी घेत मुंबईच्या डावाला सुरूंग लावला. दीपक चहरने २ बळी घेत ब्राव्होला उत्तम साथ दिली. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. 

    23:15 (IST)19 Sep 2021
    मुंबईला शेवटच्या षटकात २४ धावांची गरज

    मुंबईला शेवटच्या षटकात २४ धावांची गरज आहे. सौरभ तिवारी ४९ धावांवर नाबाद आहे.

    22:47 (IST)19 Sep 2021
    कृणाल पंड्या धावचित

    १५व्या षटकात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या धावचित झाला. मुंबईला आता विजयासाठी ३० चेंडूत ६० धावांची गरज आहे.

    22:40 (IST)19 Sep 2021
    मुंबईचा कर्णधार पोलार्ड माघारी

    चेन्नईचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने पोलार्डला पायचित पकडत मुंबईचे कंबरडे मोडले. मुंबईने ८८ धावांत ५ फलंदाज गमावले.

    22:20 (IST)19 Sep 2021
    ब्राव्होने इशान किशनला धाडले माघारी

    १०व्या षटकात इशान किशनने चुकीचा फटका खेळत ब्राव्होला आपली विकेट दिली. किशनने ११ धावा केल्या.

    22:03 (IST)19 Sep 2021
    अनमोलनंतर सूर्यकुमारही माघारी

    वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने सूर्यकुमार यादवला (३)  डु प्लेसिसकरवी झेलबाद करत चेन्नईला तिसरे यश मिळवून दिले. सौरभ तिवारी फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने ३ बाद ४१ धावा केल्या.

    21:59 (IST)19 Sep 2021
    अनमोलप्रीत क्लीन बोल्ड

    दीपक चहरने सुंदर फटके खेळलेल्या अनमोलप्रीतची दांडी गुल करत त्याला तंबूचा मार्ग दाखवला, अनमोलने १६ धावा केल्या. मुंबईकडून इशान किशन फलंदाजासाठी मैदानात आला आहे. 

    21:46 (IST)19 Sep 2021
    मुंबईला पहिला धक्का

    आक्रमक सुरुवात केलेल्या क्विंटन डी कॉकला दीपक चहरने पायचित पकडले. डी कॉकने १७ धावा केल्या.त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला आहे.

    21:36 (IST)19 Sep 2021
    मुंबईच्या फलंदाजीला सुरुवात

    मुंबईकडून पदार्पणवीर अनमोलप्रीत सिंग आणि  क्विंटन डी कॉक यांनी सलामी दिली.

    21:20 (IST)19 Sep 2021
    चेन्नईच्या २० षटकात ६ बाद १५६ धावा

    सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या ८८ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर चेन्नईने मुंबईसमोर २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. ऋतुराजने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले. मुंबईकडून बोल्ट, मिल्ने आणि बुमराह यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

    21:14 (IST)19 Sep 2021
    स्फोटक खेळी करून ब्राव्हो बाद

    ७ चेंडूत २३ धावांची खेळी करून ब्राव्हो शेवटच्या षटकात झेलबाद झाला. त्याने ३ षटकार ठोकले.

    21:09 (IST)19 Sep 2021
    ब्राव्होची फटकेबाजी

    १९व्या षटकात ड्वेन ब्राव्होने बोल्टला सलग दोन षटकार खेचले. 

    21:00 (IST)19 Sep 2021
    चेन्नईला पाचवा धक्का

    वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने जडेजाला झेलबाद करत ही भागीदारी तोडली. गायकवाड-जडेजा यांनी ८१ धावांची भागीदारी केली, जडेजाने २६ धावा केल्या. त्याच्यानंतर ड्वेन ब्राव्हो फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.

    20:55 (IST)19 Sep 2021
    गायकवाडचे झुंजार अर्धशतक

    १६व्या षटकात ऋतुराज गायकवाडने आपले झुंजार अर्धशतक पूर्ण केले. 

    20:50 (IST)19 Sep 2021
    गायकवाड-जडेजाची अर्धशतकी भागीदारी

    १५ षटकात चेन्नईने ४ बाद ८७ धावा केल्या. दरम्यान गायकवाड-जडेजा यांनी आपली अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 

    20:33 (IST)19 Sep 2021
    चेन्नईचे अर्धशतक

    ऋतुराज गायकवाडने १२व्या षटकात कृणाल पंड्याला षटकार खेचत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. 

    20:26 (IST)19 Sep 2021
    पॉवरप्लेमध्ये चेन्नईचा नकोसा विक्रम

    चेन्नईच्या संघाने पॉवरप्लेमध्ये चार किंवा अधिक विकेट गमावण्याची ही दहावी वेळ आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध चार वेळा असे झाले आहे.

    20:21 (IST)19 Sep 2021
    चेन्नईला भागीदारीची आवश्यकता

    ९ षटकात चेन्नईने ४ बाद ३५ धावा केल्या असून त्यांना मोठ्या भागीदारीची आवश्यकता आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड १९ तर रवींद्र जडेजा ६ धावांवर खेळत आहे. पाचवा धक्का घेण्यापासून चेन्नईचा संघ बचावला.क्विंटन डी कॉकने राहुल चहरच्या चेंडूवर गायकवाडचा झेल सोडला.

    20:06 (IST)19 Sep 2021
    पॉवरप्लेमध्ये चेन्नईने गमावली धोनीचीही विकेट

    पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये चेन्नईची सुरुवात खराब झाली. त्यांना ४ गड्यांच्या मोबदल्यात फक्त २४ धावा करता आल्या. सलामीवीर गायकवाड मैदानात असून मिल्नेने धोनीला बोल्टकरवी वैयक्तिक ३ धावांवर बाद केले. 

    19:54 (IST)19 Sep 2021
    सुरेश रैनाही ठरला फ्लॉप

    मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सुरेश रैनाला बाद करत चेन्नईला तिसरा धक्का दिला. रैनाला ४ धावा करता आल्या. रैनानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात आला आहे.

    19:46 (IST)19 Sep 2021
    दुखापतीमुळे अंबाती रायुडूने मैदान सोडले

    दुसऱ्या षटकात मिल्नेने आखूड टप्प्याचा चेंडू टाकला, हा चेंडू खेळताना रायुडूच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे त्याने मैदान सोडले. त्याची जागा घेण्यासाठी सुरेश रैना मैदानात आला आहे. 

    19:40 (IST)19 Sep 2021
    चेन्नईला दुसरा धक्का

    प्लेसिसनंतर मैदानात आलेला मोईन अलीसुद्धा शून्यावर बाद झाला. मिल्नेने त्याला सौरभ तिवारीकरवी झेलबाद केले. 

    19:37 (IST)19 Sep 2021
    चेन्नईला पहिल्याच षटकात धक्का

    बोल्टने पहिल्याच षटकात फाफ डु प्लेसिसला मिल्नेकरवी झेलबाद केले. प्लेसिसला भोपळाही फोडता आला नाही. प्लेसिसनंतर मोईन अली मैदानात आला आहे. पहिल्या षटकात चेन्नईला फक्त एक धाव करता आली. 

    19:29 (IST)19 Sep 2021
    चेन्नईचे सलामीवीर मैदानात

    चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड हे सलामी फलंदाज म्हणून मैदानात आले आहेत. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट पहिले षटक टाकत आहे.

    19:17 (IST)19 Sep 2021
    अनमोलप्रीत सिंग करतोय मुंबईकडून पदार्पण

    अनमोलप्रीत सिंग मुंबईकडून पदार्पण करत आहे. पंजाबच्या या २३ वर्षीय फलंदाजाचा प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये जबरदस्त विक्रम आहे. अनमोलप्रीतने २७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४४च्या सरासरीने १६९१ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर पाच शतके आणि आठ अर्धशतके आहेत.

    19:04 (IST)19 Sep 2021
    रोहित बाहेर, पोलार्डकडे नेतृत्व

    चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा नियमित कर्णँधार रोहित शर्मा दुखापतीमुळे आजचा सामना खेळत नसून कायरन पोलार्डने मुंबईची कमान सांभाळली आहे.

    18:16 (IST)19 Sep 2021
    चेन्नई सुपर किंग्ज वचपा घेण्यासाठी सज्ज

    ‘आयपीएल’ स्थगित होण्यापूर्वी झालेल्या अखेरच्या लढतीत मुंबईनेच २१९ धावांचे लक्ष्य गाठून चेन्नईला धूळ चारली होती. त्या पराभवानंतरही महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघ गुणतालिकेत मुंबईपेक्षा वरच्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू सॅम करन विलगीकरणामुळे या लढतीला मुकण्याची शक्यता असली, तरी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत छाप पाडणारा शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि दीपक चहर असे पर्याय चेन्नईकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे चेन्नईला गतपराभवाचा वचपा काढून गुणतालिकेत अग्रस्थान पटकावण्याची संधी आहे.

    18:16 (IST)19 Sep 2021
    मुंबई इंडियन्सच्या सहा ताऱ्यांवर लक्ष

    मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि राहुल चहर या सहा जणांची टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याने आपसूकच त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. याशिवाय ट्रेंट बोल्ट, किरॉन पोलार्ड आणि क्विंटन डीकॉक या विदेशी त्रिकुटाने मुंबईसाठी सातत्याने योगदान दिले आहे. मुंबईने सुरुवातीपासूनच जम बसवल्यास यंदा सलग तिसऱ्यांदा चषक उंचावण्यापासून त्यांना रोखणे कठीण जाईल.

    18:15 (IST)19 Sep 2021
    हेड-टू -हेड आकडेवारी

    उभय संघांत आतापर्यंत ३१ ‘आयपीएल’ सामने झाले असून, यापैकी मुंबईने १९ आणि चेन्नईने १२ सामने जिंकले आहेत. गेल्या सहा सामन्यांमध्ये मुंबईने सीएसकेचा पाच वेळा पराभव केला आहे. याशिवाय, या हंगामात दोन्ही संघ आमनेसामने असताना, मुंबईने चार विकेट्सने विजय मिळवला. म्हणजेच रोहितचा संघ अजूनही धोनीच्या संघावर वर्चस्व गाजवत आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबईने पाच वेळा जेतेपद पटकावण्यात यश मिळवले आहे, तर चेन्नईला तीन वेळा जेतेपद जिंकण्याची संधी मिळाली आहे. यावेळी दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. 

    18:13 (IST)19 Sep 2021
    थोड्याच वेळात होणार नाणेफेक

    आयपीएल २०२१चा ३० वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होईल.

    मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Ipl 2021 mumbai indians vs chennai super kings live update adn
    First published on: 19-09-2021 at 18:11 IST