News Flash

MI vs RCB : सलामीच्या सामन्यात बंगळुरूची मुंबईवर 2 गड्यांनी मात

एबी डिव्हिलियर्सची वादळी खेळी

मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएलच्या नव्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलंजर्स बंगळुरू हे दोन संघ आमने सामने आले होते. या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला झटपट फलंदाजी केल्यानंतर मु्ंबईचे फलंदाज शेवटच्या षटकात धावा जमवण्यात अपयशी ठरले. मुंबईने 20 षटकात 9 गडी गमावत 159 धावा केल्या. बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने 27 धावांत 5 बळी घेत मुंबईच्या डावाला सुरूंग लावला. प्रत्युत्तरात बंगळुरूने 2 गडी राखून विजय नोंदवला.

बंगळुरूचा डाव

मुंबईच्या 160 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि वॉशिंग्टन सुंदरने बंगळुरूसाठी सलामी दिली. बोल्टच्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितने वॉशिंग्टनला जीवदान दिले. पाचव्या षटकात कृणालने वॉशिंग्टन सुंदर बाद करत बंगळुरूला पहिला धक्का दिला. सुंदरने 10 धावा केल्या. पाच षटकात बंगळुरूने 1 बाद 41 धावा केल्या. पहिल्या षटकात महागड्या ठरलेल्या बोल्टने पदार्पणवीर रजत पाटीदारला बाद करत बंगळुरूला दुसरा धक्का दिला.

त्यानंतर विराट  कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतकी भागीदारी रचली. जसप्रीत बुमराहने विराटला बाद करत ही भागीदारी तोडली. विराटने 4 चौकारांसह 33 धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर मॅक्सवेलही मैदानावर जास्त वेळ थांबू शकला नाही. जलदगती गोलंदाज जानसेनने त्याला झेलबाद केले. मॅक्सवेलने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावा केल्या. याच षटकात जानसेनने शाहबाझ अहमदला बाद करत बंगळुरूला अजून संकटात टाकले. त्यानंतर मैदानात आलेला डॅन ख्रिश्चनही काही खास कामगिरी करू शकला नाही. बुमराहने त्याला स्वस्तात बाद केले. मात्र, त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने एकट्याने मोर्चा सांभाळत बुमराह, बोल्टवर आक्रमण केले.

मुंबईचा डाव

आरसीबीकडून फलंदाजीचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा आणि ख्रिस लीन या फलंदाजांची जोडी सलामीसाठी मैदानात आली. पहिल्या दोन षटकात बंगळुरूच्या गोलंदाजांनी रोहित-लिनला हात खोलूू दिले नाही. मात्र, तिसऱ्या षटकात रोहितने सिराजला यंदाच्या हंगामातील पहिला चौकार खेचला. रोहित मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना तो धावबाद झाला. युजर्वेंद्र चहलच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेताना रोहित वैयक्तिक 19 धावांवर माघारी परतला. पहिल्या पाच षटकात मुंबईने 1 बाद 30 धावा उभारल्या.

रोहितनंतर आलेल्या सूर्यकुमारने लिनला हाताशी घेत संघासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. बंगळुरूचा गोलंदाज काईल जेमीसनने सूर्यकुमारला यष्टीमागे झेलबाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. सूर्यकुमारने 31 धावांची खेळी केली. सूर्यकुमारनंतर लिनही तंबूत परतला. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने त्याला अर्धशतक करू दिले नाही. लिनने 4 चौकार आणि 3 षटकारांसह 49 धावा केल्या.  बंगळुरूने स्थिरावलेल्या सूर्यकुमार-लिनला बाद केल्यानंतर हार्दिक पंड्या आणि ईशान किशनची जोडी मैदानात आली. मात्र, वेगवान गोलंदाज हर्शल पटेलने हार्दिकला पायचित  पकडत मुंबईला चौथा धक्का दिला. त्यानंतर हर्षलने किशनला वैयक्तिक 28 धावांवर माघारी धाडत आपला दुसरा बळी घेतला. त्यानंतर आरसीबीने मुंबईच्या फलंदाजांना जास्त फटकेबाजी करू दिली नाही. हर्षलने शेवटच्या षटकात कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डला लागोपाठ चेंडूवर बाद केले. याच षटकात हर्षलने जानसेनला यॉर्कर टाकत आपले 5 बळी पूर्ण केले. बंगळुरूकडून हर्षलने टाकलेल्या या शेवटच्या षटकात मुंबईला एकच धाव मिळाली.

कोण आत कोण बाहेर?

सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल बंगळुरूच्या संघाबाहेर असून रजत पाटीदारने पदार्पणाचा सामना खेळला. क्वारंटाइन कालावधीत असलेला क्विंटन डि कॉक मुंबईसोबत पहिला सामना खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी ख्रिस लिनने मुंबईकडून पदार्पणाचा सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेचा उंचपुरा खेळाडू मार्को जानसेनने आज आयपीएल पदार्पण केले.

प्लेईंग XI

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, ख्रिस लिन, मार्को जानसेन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल ख्रिश्चन, वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमीसन, मोहम्मद सिराज, यजुर्वेंद्र चहल, हर्षल पटेल, रजत पाटीदार, शाहबाज अहमद.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 7:02 pm

Web Title: ipl 2021 mumbai indians vs royal challengers bangalore match report adn 96
Next Stories
1 IPL 2021 : RCBविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईला धक्का, ‘स्टार’ खेळाडू संघाबाहेर
2 MI Vs RCB: अंतिम संघात ‘या’ खेळाडुंना स्थान मिळण्याची शक्यता
3 MI vs RCB : आजच्या सामन्यात पोलार्डला दोन ‘द्विशतके’ ठोकण्याची संधी
Just Now!
X