आयपीएल २०२१मध्ये खेळणारा न्यूझीलंडचा क्रिकेटपटू टिम सेफर्ट करोनातून सावरला आहे. आयपीएलमध्ये करोनाचा शिरकाव झाला असताना सेफर्टलाही या विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर त्याला भारतातच आयसोलेट करण्यात आले. करोनावर मात केल्यानंतर तो मायदेशी परतला. तिथे गेल्यावर त्याने भारतातील करोनाच्या अनुभवाविषयी भाष्य केले, मात्र ही स्थिती सांगताना त्याला आपले अश्रू अनावर झाले. बायो बबलचा फुगा फुटल्यामुळे आयपीएलचा १४वा हंगाम २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आला.

आयपीएल २०२१मध्ये टिम सेफर्ट हा कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) भाग होता. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर तो सहकाऱ्यांसमवेत न्यूझीलंडला निघणार होता, मात्र तो आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. घरी पोहोचल्यानंतर सेफर्ट १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत आहे. यादरम्यान त्याने ऑनलाइन संवाद साधला. भारतातील करोनाविषयीची स्थिती सांगताना तो भावूक झाला.

 

सेफर्ट म्हणाला, ”जेव्हा मला कळले, की मी करोना पॉझिटिव्ह आहे, तेव्हा मला जग थांबल्यासारखे वाटले. पुढे काय होणार आहे याचा मला खरोखरच विचार करता आला नाही आणि हे सर्वात भयानक होते. तुम्ही वाईट गोष्टींबद्दल ऐकता आणि असा विचार करता, की ही गोष्ट माझ्यासोबतही होणार आहे.”

 

ब्रेंडन मॅक्युलम आणि स्टीफन फ्लेमिंग यांनी मदत केल्याचे सेफर्टने सांगितले. तो म्हणाला ”त्यांनी सर्व गोष्टी सोप्या केल्या. सीएसके व्यवस्थापन आणि केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मला सर्वकाही ठीक होईल याची जाणीव करून दिली. जेव्हा घरी परतण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी सुरक्षित प्रवासासाठी सर्वकाही केले.”

या काळात सेफर्टला सकारात्मक मानसिकता ठेवण्यास देखील मोठी मदत झाली. तो येत्या दोन महिन्यांत लग्न करणार आहे. “माझी होणारी बायको खूप खूष आहे. मी नियोजित वेळपूर्वी परत आलो आहे, जेणेकरुन मी सर्व योजनांमध्ये तिला मदत करू शकेन”, असे सेफर्टने सांगितले.

हेही वाचा – करोनाचा सामना करण्यासाठी RCB तयार, ४५ कोटींच्या मदतीची घोषणा