इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 2-1 असा विजय संपादन केल्यानंतर आता सर्वांना आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे वेध लागले आहे. 9 एप्रिल ते 30 मे अशा कालावधीत आयपीएलचे सामने रंगणार आहेत. त्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडू आपापल्या फ्रेंचायझीकडे निघाले आहेत. आज सोमवारी कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडूही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाले आहेत.

 

मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. हे तीन खेळाडू मुंबईत आल्याचे संघाने सांगितले. ”भारताचे प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान आहे. देशासाठी खेळणे हे माझ्यासाठी स्वप्न होते. दमदार संघाचा भाग होता आल्यामुळे मला चांगले वाटत आहे. आता माझी ती भूमिका संपली असून मी आता मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात परतलो आहे”, असे सूर्यकुमारने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले.

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेद्वारे सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात सूर्यकुमारने शानदार खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. या कामगिरीमुळे त्याची वनडे संघातही निवड झाली. मात्र, त्याला एकही सामना खेळता आला नाही. कृणाल पंड्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनेडत वेगवान अर्धशतक झळकावत पदार्पण केले. तर, शेवटच्या वनडेच हार्दिकने 64 धावांची खेळी करत भारताच्या विजयात योगदान दिले.

मुंबईचा पहिला सामना 9 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्सशी चेन्नईत होणार आहे.

असा झाला तिसरा सामना

पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 धावांनी सरशी साधली. या विजयासह कोहली ब्रिगेडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने इंग्लंडसमोर 330 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 322 धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीची फळी ढासळल्यानंतर सॅम करन भारतासमोर उभा राहिला. त्याने नाबाद 95 धावा करत टीम इंडियाचे टेंशन वाढवले, मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. मात्र, यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनने या षटकात अवघ्या 6 धावा देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सॅम करनला सामनावीर, तर जॉनी बेअरस्टोला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.