News Flash

RR vs PBKS : रोमहर्षक सामन्यात पंजाबचा राजस्थानवर निसटता विजय

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची शतकी झुंज व्यर्थ

पंजाब किंग्ज

आयपीएल 2021च्या रणसंग्रामाला आता खऱ्या अर्थाने रंग चढू लागला आहे. वानखेडेवर रंगलेल्या अटीतटीच्या सान्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 4 धावांनी मात दिली. नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 20 षटकात 6 बाद 221 धावांचा डोंगर उभारला. पंजाबकडून लोकेश राहुल, दीपक हुड्डा यांनी वादळी खेळी करत संघाला दोनशेपार पोहोचवले. प्रत्युत्तरात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने झुंजार शतक ठोकत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र,  वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टाकलेल्या शेवटच्या षटकात तो बाद झाला आणि राजस्थानने हा सामना गमावला. 119 धावांची खेळी करणाऱ्या सॅमसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

राजस्थानचा डाव

पंजाबच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सलामीवीर बेन स्टोक्स शून्यावर माघारी परतला. तिसऱ्या षटकात एम. अश्विनने मनन वोहराचा सोपा झेल सोडला. मात्र, या जीवदानाचा वोहराला फायदा करून घेता आला नाही. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर तो वैयक्तिक 12 धावांवर बाद झाला. वोहरा आणि स्टोक्स बाद झाल्यावर जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी राजस्थानचा डाव सांभाळला. या दोघांनी 45 धावांची भागीदारी रचली. वेगवान गोलंदाज रिचर्ड्सनने यॉर्कर टाकत बटलरला बाद केले. बटलरने 25 धावा केल्या. दुसऱ्या बाजुला सॅमसन संघाची धावगती वाढवत होता. त्याने 11व्या षटकात आपले अर्धशतक आणि संघाचे शतक पूर्ण केले. बटलर बाद झाल्यानंतर मैदानात आलेला शिवम दुबे 23 धावांची खेळी करून बाद झाला. अर्शदीपने त्याला झेलबाद केले.

यानंतर रियान पराग आणि सॅमसन यांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. 19 षटकात या दोघांनी अर्धशतकी भागीदारी उभारली. 11 चेंडूत 25 धावा केलेल्या परागला मोहम्मद शमीने बाद करत राजस्थानचे संकट वाढवले. मात्र, एका बाजूने सॅमसनने आपली आक्रमकता कायम राखत 54 चेंडूत शतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजुला असलेल्या तेवतियाला मात्र मोठी खेळी करता आली नाही. मेरेडिथने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 13 धावांची गरज होती. मात्र, या षटकात अर्शदीपने 8 धावा देत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एका चेंडूत 5 धावा असताना सॅमसन झेलबाद झाला. त्याने 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांसह 119 धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीपने 3 तर, मोहम्मद शमीने 2 बळी घेतले.

पंजाबचा डाव

पंजाब किंग्जकडून कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली.  वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने मयंकला झेलबाद करत आयपीएलमधील पहिला बळी घेतला. मयंकने 14 धावा केल्या.  त्यानंतर ख्रिस गेल आणि राहुलने संघासाठी धावा उभारल्या. पहिल्या पावरप्लेमध्ये पंजाबने 1 बाद 46 धावा केल्या. त्यानंतर या दोघांनी  अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. हे दोघे डोकेदुखी ठरणार असे वाटत असताना  रियान पराग राजस्थानसाठी धावून आला. त्याने आक्रमक झालेल्या ख्रिस गेलला बाद करत ही भागीदारी मोडली. गेलने 28 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावा केल्या. स्टोक्सने गेलचा सुंदर झेल टिपला. त्यानंतर 13व्या षटकात कर्णधार लोकेश राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले.

गेलनंतर मैदानात आलेल्या दीपक हुड्डाने आक्रमक फटकेबाजी करत राहुलसोबत 22 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. या भागीदारीनंतर हुड्डाने 20 चेंडूत वादळी अर्धशतक पूर्ण केले. राहुल-हुड्डाने 18व्या षटकात आपली शतकी भागीदारी पूर्ण केली. अवघ्या 45 चेंडूत या दोघांनी शतकी भागीदारी उभारली.  त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात मॉरिसच्या गोलंदाजीवर हुड्डा बाद झाला. त्याने 28 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 64 धावांची वादळी खेळी केली. 18व्या षटकात पंजाबचे द्विशतक फलकावर लागले. याच षटकात चेतन साकारियाने निकोलस पूरनचा जबरदस्त झेल घेतला. पूरनला भोपळाही फोडता आला नाही. डावाच्या शेवटच्या षटकात लोकेश राहुल बाद झाला. सीमारेषेवर राहुल तेवतियाने चपळाई दाखवत राहुलचा झेल टिपला. राहुलने 50 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकरांसह 91 धावांची खेळी केली. राजस्थानकडून 8 गोलंदाजांनी षटके टाकली. चेतन साकारियाने 3, ख्रिस मॉरिसने 2 बळी घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 11:55 pm

Web Title: ipl 2021 pbks beat rr by four runs in mumbai adn 96
Next Stories
1 VIDEO : राहुलचा राहुलने घेतला जबरदस्त झेल
2 IPL 2021: पंजाबच्या दीपक हुड्डाची वेगवान अर्धशतकी खेळी
3 IPL 2021: ट्रक चालकाचा पोरगा ते राजस्थानकडून आयपीएल खेळणारा गोलंदाज
Just Now!
X