पंजाबनं बंगळुरुवर ३४ धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. या विजयासाह गुणतालिकेत पंजाबचा संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पंजाबनं ५ गडी गमवत १७९ धावा केल्या होत्या आणि विजयासाठी १८० धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बंगळुरुचा संघ ८ गडी गमवून १४५ धावा करू शकला. पंजाबच्या विजयात हरप्रीत ब्रारने मोलाची भूमिका बजावली. त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हरप्रीतने ४ षटकात १९ धावा देत तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले. एक षटक निर्धाव टाकलं. तर फलंदाजीत १७ चेंडूत २५ धावा केल्या. त्यात १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. हरप्रीतने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सला बाद केलं. विराट कोहली ३५ धावा करून तंबूत परतला. हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. तर दुसऱ्या चेंडूवरच ग्लेन मॅक्सवेलही त्रिफळाचीत झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतरच्या षटकात एबी डिव्हिलियर्सलाही त्याने तंबूचा रस्ता दाखवला.

फलंदाजी करताना पाच गडी बाद झाल्याने पंजाबची धावसंख्या मंदावली होती. मात्र केएल राहुल आणि हरप्रीत ब्रार यांनी सहाव्या गड्यासाठी चांगली भागिदारी केली. त्यामुळे पंजाबला १७९ धावा करता आल्या. कर्णधार केएल राहुलला बंगळुरुच्या विरुद्धच्या सामन्यात लय सापडली . त्याने ५७ चेंडूत ९१ धावा केल्या. यात ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे.

पंजाबनं दिलेल्या १८० धावांचा पाठलाग करताना बंगळुरुच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दडपण दिसत होतं. पॉवर प्लेमध्ये कमी धावा झाल्याने हे दडपण नंतर वाढतच गेलं. बंगळुरुला देवदत्त पडिक्कलच्या रुपानं पहिला धक्का बसला. रिले मेरेदिथच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने ६ चेंडूत ७ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली ३५ धावा करून तंबूत परतला. ग्लेन मॅक्सवेलही शून्यावर बाद झाला. एबी डिव्हिलियर्सही चांगली कामगिरी करू शकला नाही. हरप्रीतच्या गोलंदाजीवर बाद झाला. विजयी अंतर कमी करण्यासाठी रजत पाटिदारने आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्नही अपयशी ठरला. ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. त्यानंतर शाहबाज अहमद आणि सॅमला रवि बिश्नोईने तंबूचा रस्ता दाखवला. हर्षल पटेलनं १३ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. मात्र विजयी अंतर खूप असल्याने त्याचा फायदा झाला नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रवि बिश्नोईने त्याचा अप्रतिम झेल घेतला.

पंजाबचा पुढचा सामना दिल्लीसोबत २ मे रोजी आहे. दिल्लीने यापूर्वीच्या सामन्यात पंजाबला ६ गडी आणि १० राखून पराभूत केलं होतं. त्यामुळे या पराभवाचा वचपा कसा काढतात याकडे क्रीडाप्रेमींच लक्ष लागून आहे.