News Flash

MI vs PBKS : पंजाबचा चेन्नईमध्ये विजयी भांगडा, मुंबईला नमवले

रोहित शर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

पंजाब किंग्ज

पॉवरप्लेमध्ये संथ खेळी, गचाळ क्षेत्ररक्षण आणि फसलेली रणनिती यामुळे मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्जविरुद्ध ९ गड्यांनी मात खावी लागली. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२१चा १७वा सामना खेळवण्यात आला. यात नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या मुंबईने चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर २० षटकात ६ बाद १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबकडून केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी दमदार भागीदारी रचत १७.४ षटकातच हा विजय मिळवला. राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

पंजाबचा डाव

मुंबईच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. ५३ धावांची सलामी भागीदारी केल्यानंतर पंजाबला पहिला धक्का बसला. मंबईचा फिरकीपटू राहुल चहरने मयंकला (२५) धावांवर बाद केले. सूर्यकुमारने त्याचा झेल घेतला. त्यानंतर मैदानात आलेल्या ख्रिस गेलने राहुलसोबत १६व्या षटकात पंजाबचे शतक फलकावर लावले. राहुलने १७व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. १८व्या षटकात या दोघांनी पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ख्रिस गेल आणि केएल राहुल यांनी ७९ धावाची अभेद्द भागीदारी रचत हा विजय साकारला. राहुलने नाबाद ६० तर गेलने नाबाद ४३ धावांचे योगदान दिले.

मुंबईचा डाव

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात मुंबईचा सलामीवीर क्विंटन डि कॉकने दीपक हुडाला  मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, मोझेस हेन्रिक्सने त्याचा झेल टिपला. कॉकला ३ धावा करता आल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला. पॉवरप्लेमध्ये मुंबईने १ बाद २१ धावा केल्या. डि कॉक बाद झाल्यानंतर रोहितला साथ देण्यासाठी ईशान किशन मैदानात आला. मात्र, मुंबईने पॉवरप्लेनंतर ईशान किशनला गमावले. आज संधी मिळालेल्या फिरकीपटू रवी बिश्नोईने किशनला यष्टीपाठी झेलबाद केले. किशनला १७ चेंडूत केवळ ६ धावा करता आल्या. त्यानंतर रोहित-सूर्यकुमार यांनी अर्धशतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सांभाळला. १४व्या षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले.

रवी बिश्नोईने पंजाबला १७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यश मिळवून दिले. मोठा फटका खेळण्याच्या नादात सूर्यकुमार यादव ख्रिस गेलकडे झेल देऊन बसला. सूर्यकुमारने ३ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. पुढच्याच षटकात मुंबईने रोहितला गमावले. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. या दोघांनंतर मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि बिश्नोईने प्रत्येकी २ बळी घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 11:15 pm

Web Title: ipl 2021 punjab kings beat mumbai indians by 9 wickets adn 96
टॅग : IPL 2021
Next Stories
1 IPL 2021 : पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबईने नोंदवली लाजिरवाणी कामगिरी
2 MI vs PBKS IPL 2021 Live Update : पंजाबची मुंबईवर ९ गड्यांनी मात, राहुल-गेलची दमदार भागीदारी
3 VIDEO : “…म्हणून मी पिचवर ४ वेळा बॅट ठोकतो”
Just Now!
X