चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आज आयपीएलचा चौदावा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवला गेला. नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र तो त्याच्या अंगउलट आला. खलील अहमद, अभिषेक शर्मा यांनी हैदराबादकडून प्रभावी गोलंदाजी करत पंजाबला 120 धावांत सर्वबाद केले. प्रत्युत्तरात हैदराबादने एक गडी गमावत हे आव्हान पूर्ण केले. हैदराबादचा सलामीवर जॉनी बेअरस्टोने 63 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

हैदराबादचा डाव

पंजाबच्या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये हैदराबादसाठी 50 धावा उभारल्या. 11व्या षटकात फॅबिएन एलनने डेव्हिड वॉर्नरला माघारी धाडत पंजाबला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नरने 3 चौकार आणि एका षटकारासह 37 धावा केल्या. वॉर्नर-बेअरस्टो यांनी 73 धावांची सलामी दिली. त्यानंतर बेअरस्टो आणि केन विल्यमसन यांनी 16व्या षटकात हैदराबादला शतक गाठून दिले. त्यानंतर बेअरस्टोने आपले अर्धशतक पूर्ण केले. 18.4 षटकात हैदराबादने विजय मिळवत गुणतालिकेत आपले खाते उघडले. बेअरस्टोने 3 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 63 धावांची खेळी केली. तर विल्यमसन 16 धावांवर नाबाद राहिला.

पंजाबचा डाव

केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पंजाबच्या डावाची सुरुवात केली. उत्तम फॉर्मात असलेल्या राहुलला आज मोठी खेळी करण्यात अपयश आले. हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला केदार जाधवकरवी झेलबाद केले. राहुलला 4 धावा करता आल्या. त्यानंतर पॉवरप्लेमध्ये अग्रवाल आणि ख्रिस गेल यांनी धावा काढल्या. 6 षटकात पंजाबने 32 धावा फलकावर लावल्या. पॉवरप्लेच्या समाप्तीनंतर अग्रवाल बाद झाला. खलील अहमदने अग्रवालला (22) झेलबाद केले. अग्रवालनंतर आलेला निकोलस पूरनही शून्यावर धावबाद झाला. हैदराबादचा फिरकीपटू राशिद खानने 9व्या षटकात ख्रिस गेलला पायचित पकडत पंजाबला चौथा धक्का दिला. गेलने 15 धावा केल्या.

गेलनंतरही पंजाबला सावरता आले नाही. हैदराबादच्या अभिषेक शर्माने 12व्या आणि 14व्या षटकात पंजाबच्या दोन फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. त्याने आधी दीपक हुडाला (13) पायचित पकडले. त्यानंतर अभिषेकच्या गोलंदाजीवर मोझेस हेन्रिक्स  (14) यष्टिचित झाला. या पडझडीनंतर शाहरुख खानव्यतिरिक्त (22) पंजाबचे इतर फलंदाज योगदान देण्यात अपयशी ठरले. शेवटच्या षटकात मोहम्मद शमी धावबाद होताच पंजाबचा डाव 120 धावांवर संपुष्टात आला.  हैदराबादकडून खलील अहमदने 21 धावांत 3, अभिषेक शर्माने 2 बळी घेतले.

कोण आत कोण बाहेर?

पंजाबच्या संघात आज दोन बदल झाले असून झाय रिचर्ड्सन आणि रिले मेरेडिथला संघाबाहेर बसवण्यात आले आहे. राहुलने आज या दोघांऐवजी फॅबिएन एलन आणि मोझेस हेन्रिक्स यांना संघात स्थान दिले आहे. तर, हैदराबाद संघातही वॉर्नरने बदल केला आहे. अनुभवी फलंदाज केन विल्यमसन आणि केदार जाधव या फलंदाजांना संघात स्थान मिळाले आहे. मुजीब, अब्दुल समद आमि मनीष पांडे यांना संघाबाहेर बसवले असून वॉर्नरने मनीष पांडेऐवजी वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलला संधी दिली आहे. हैदराबादला आपल्या पहिल्यावहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्यांनी आत्तापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत. तर, पंजाब संघाने तीन सामन्यात दोन विजय मिळवले आहेत.

प्लेईंग XI

सनरायझर्स हैदराबाद –

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, विराट सिंह, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद. सिद्धार्थ कौल.

पंजाब किंग्ज –

लोकेश राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, शाहरुख खान, मोझेस हेनरिक्स, फॅबियन एलन.