News Flash

RR vs KKR : राजस्थानचा कोलकातावर ‘हल्लाबोल’!

कोलकाताची गुणतालिकेत शेवटच्या स्थानी घसरण

राजस्थान रॉयल्स

मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या आयपीएलच्या १८व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सला ६ गड्यांनी मात दिली. त्यामुळे कोलकाताला लीगमधील चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.  या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसच्या ४ बळींमुळे कोलकाताला २० षटकात ९ बाद १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३६ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ४२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मॉरिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.  या पराभवामुळे कोलकाताची गुणतालिकेत शेवटच्या स्थानी घसरण झाली आहे.

 

राजस्थानचा डाव

राजस्थानसाठी यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी सलामी दिली. कोलकाताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने चौथ्या षटकात बटलरला पायचित पकडले. बटलरला ५ धावा करता आल्या. सुसाट सुरुवात केलेला यशस्वी जयस्वालही पॉवलप्लेमध्ये बाद झाला. शिवम मावीने त्याला वैयक्तिक २२ धावांवर झेलबाद केले. ५ षटकात राजस्थानने २ बाद ४१ धावा केल्या. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर शिवम दुबे आणि कर्णधार संजू सॅमसनने डाव सांभाळला. १० षटकात राजस्थानने ८० धावांपर्यंत मजल मारली.  अर्धशतकी भागीदारीकडे वाटचाल करत असताना चक्रवर्तीने दुबेला माघारी धाडले. दुबेने २२ धावांचे योगदान दिले. त्यानंतर आलेला राहुल तेवतियाही स्वस्तात माघारी परतला. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने त्याला झेलबाद केले. त्यानंतर संजू सॅमसन आणि डेव्हिड मिलर यांनी १९व्या षटकात राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सॅमसनने ४२ तर मिलरने २४ धावांची नाबाद खेळी केली.

कोलकाताचा डाव

नितीश राणा आणि शुबमन गिल यांनी कोलकाताच्या डावाची सुरुवात केली.  पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात चोरटी धाव घेताना शुबमन धावबाद झाला. त्याने ११ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये कोलकाताने १ बाद २५ धावा फलकावर लावल्या.  पॉवरप्लेनंतरच्या विश्रांतीनंतर नितीश राणाही माघारी परतला. वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. राणाने २२ धावा केल्या. त्यानंतर आलेला सुनील नरिनही काही खास करू शकला नाही. जयदेव उनाडकटने त्याला १०व्या षटकात माघारी धाडले. यशस्वी जयस्वालने त्याचा उत्तम झेल टिपला.  नरिनला केवळ ६ धावा करता आल्या.

नरिननंतर आलेला कर्णधार ईऑन मॉर्गन पुन्हा अपयशी ठरला. मॉरिसच्या षटकात धाव घेताना तो धावबाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. राहुल त्रिपाठीने ३६ धावांचे योगदान देत संघाची धावगती वाढवली. पण, १६व्या षटकात मुस्तफिजुरने त्याला बाद केले. १७व्या षटकात कोलकाताने शंभरी ओलांडली.  मागील सामन्यात तुफान खेळी केलेल्या आंद्रे रसेलला ख्रिस मॉरिसने बाद केेले. रसेलने ९ धावा केल्या. याच षटकात दिनेश कार्तिकही झेलबाद झाला. कार्तिकने २५ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात मॉरिसने फक्त ६ धावा देत २ बळी टिपले. ४ षटकांमध्ये मॉरिसने २३ धावा देत ४ बळी घेत कोलकाताच्या डावाला सुरूंग लावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 11:32 pm

Web Title: ipl 2021 rajasthan royals beat kolkata knight riders by 6 wickets adn 96
Next Stories
1 IPL 2021 : राजस्थानचा रियान पराग पुन्हा एकदा ‘हटके’ सेलिब्रेशनमुळे चर्चेत!
2 “करोनाच्या संकटात IPL?”, गिलख्रिस्टच्या ट्विटची सर्वत्र होतेय चर्चा
3 RR vs KKR : राजस्थानची कोलकातावर ६ गड्यांनी सरशी, मॉरिस चमकला
Just Now!
X