पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १४ व्या पर्वाच्या मिनी ऑक्शन म्हणजेच प्राथमिक लिलावामध्ये राजस्थान रॉयल्सने आपल्या संघाचा स्टार कर्णधार स्टीव्ह स्मिथला करार मुक्त करण्याचा (रिलिज करण्याचा) निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बरीच चर्चा केल्यानंतर राजस्थान संघाच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. सुत्रांच्या हवाल्याने संघ व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिल्याचे एएनआयनं म्हटलं आहे. बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला संघाकडून कोणते खेळाडू कायम ठेवले जाणार आहेत यासंदर्भातील यादी पाठवण्याच्या शेवटच्या दिवशी स्मिथला करार मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

स्मिथने २०१४,२०१५, २०१९ आणि २०२० च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. मागील पर्वामध्ये राजस्थानचा संघ पॉइण्ट टेबलमध्ये अगदी तळाशी होता. याच कारणामुळे स्मिथला वगळण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे समजते. राजस्थान रॉयल्सनेही ट्विटरवरुन यासंदर्भातील एक पोस्ट करत राजस्थानचा संघ स्मिथचा निरोप घेत असल्याचे म्हटले आहे.

भारताचा माजी फलंदाज आणि सध्या समालोचक म्हणून काम करणाऱ्या आकाश चोप्रा यांनी यासंदर्भात यापूर्वीच संकेत दिले होते. राजस्थान रॉयल्सने नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरवला पाहिजे असं आकाश यांनी म्हटलं होतं. मागील पर्वामध्ये स्मिथचं नेतृत्व अपेक्षेपेक्षा खूपच वाईट कामगिरी असणारं ठरलं. अर्थात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचा संघात समावेश करण्यात आलेल्या संघाने चांगली कामगिरी केल्याचं पहायला मिळालं. मात्र त्यानंतरही संघ पॉइण्ट टेबलमध्ये तळाशीच होता.

नुकत्याच भारताबरोबर झालेल्या कसोटी मालिकेमध्येही स्मिथने चांगली कामगिरी केली. असं असलं तरी ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर चषक १-२च्या फरकाने गमावला.